Narendra Modi : कन्याकुमारीच्या सभेत मोदींनी आधीच्या काँग्रेस प्रणीत युपीए सरकारला केले लक्ष्य

तामिळनाडूच्या कन्याकुमारीतील एका जाहीर सभेत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवातच अभिनंदन यांच्या कौतुकाने करून काही राजकीय पक्ष माझा द्वेष करतात. आता ते देशाचाही द्वेष करू लागलेत. संपूर्ण देश आपल्या जवानांच्या आणि लष्कराच्या पाठिशी आहे. तरीही हे पक्ष लष्करावर संशय व्यक्त करत आहेत. दहशतवादाविरोधातील लढाईत जगाचाही भारताला पाठिंबा आहे. पण काही राजकीय पक्षांना दहशतवादाविरोधातील लढाईवरही संशय आहे, अशी टीका मोदींनी केली. तामिळनाडूच्या असलेल्या अभिनंदन यांच्यावर प्रत्येक भारतीयाला गर्व आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारीत अनेक विकास कामांचं लोकार्पण केलं. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मोदींनी आधीच्या काँग्रेस प्रणीत युपीए सरकारला लक्ष्य केलं. लष्कराला दहशतवाद्यांचा बदला घ्यायचा आहे, अशा बातम्या वृत्तपत्रातून येत होत्या. तरीही युपीए सरकारने त्यांना परवानगी दिली नाही. मात्र, आता दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी सैन्याला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत, असं मोदींनी स्पष्ट केलं.
पाकिस्तान अभिनंदन यांना अटारी सीमेवरून भारताच्या हवाली करणार आहे. अनेक वर्षांपासून देश दहशतवादाचा सामना करतोय. २००४ पासून ते २०१४ पर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले. जयपूर, मुंबई, पुणे, हैदराबाद यासह अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. २६/११ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही. पण उरी आणि पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा आम्ही बदला घेतला. देशाच्या शूरवीर जवानांना मी सॅल्युट करतो, असं मोदी म्हणाले.