Abhinandan welcome back : आणि भारतीयांना झाले वाघाचे दर्शन

अखेर भारतीय वायू दलाचे विंग कमांडर पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान अखेर मायभूमीत परतले. पाकिस्तानने रात्री नऊ वाजेच्या सुमारास कडक सुरक्षेत अभिनंदन यांना भारताच्या हवाली केले. मात्र, यासाठी पाकने भारतीयांना मोठी प्रतीक्षा करायला लावली.
भारताच्या हवाई दलाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या पथकाने अभिनंदन यांचे मायभूमीत स्वागत केले. अभिनंदन यांचे आई-वडीलही यावेळी उपस्थित होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा सीमेवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. अभिनंदन यांनी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करताच तेथे उपस्थित भारतीयांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. हा क्षण टीव्हीवरून पाहणाऱ्या देशवासियांनीही एकच जल्लोष केला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पायलट अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्याची घोषणा गुरुवारी केली होती. त्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास पाकिस्तानच्या सैन्याने अभिनंदन यांना भारताच्या हवाली केले. अभिनंदन मायभूमीत दाखल होताच एअर व्हाईस मार्शल प्रभाकरन आणि एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी अभिनंदन यांचे स्वागत केले. आता अभिनंदन यांना अमृतसरला नेण्यात येईल. तिथे त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.