Air Strike : अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारत -पाक यांच्यात चर्चा

सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सहीसलामत भारतात आण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न चालू असून हाच मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आहे. अभिनंदन यांना कोणतीही इजा न करता सहीसलामत भारतात पाठवा , अशा सक्त शब्दांत केंद्राने इस्लामाबादला सांगितले असून पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जाते. १९४९च्या जिनेव्हा परिषदेनुसार युद्धातील लष्करी कैद्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीविषयी एक मार्गदर्शिका करण्यात आली आहे. यात भारतीय आणि पाकिस्तानी लष्कर तसेच बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात एक अनौपचारिक सामंजस्यपणा आहे.
दरवर्षी किमान तीन वेळा अशा सीमारेषा ओलांडण्याच्या घटना घडतात. अशावेळी त्या सैनिकाची किंवा कर्मचाऱ्याची ओळख पटली की काही तासांत किंवा काही दिवसांत परत पाठवले जाते. संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्याला हस्तांतरित केले जाते. दरम्यान, वैमानिकांसाठीच्या प्रकरणात जिनेव्हा परिषदेत कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. अशावेळी दिल्ली आणि इस्लामाबाद दोघेही योग्य कालावधी मान्य करतील. केंद्र सरकारने पाकिस्तानी सरकारला वर्धमान यांना त्वरीत आणि सुरक्षित परत पाठवण्यास सांगितले आहे. १९९९ मध्ये जेव्हा भारतीय वायूसेनेचे वैमानिक के नचिकेत यांना पाकने पकडले होते. त्यावेळी पाकने नचिकेत यांना ८ दिवसानंतर सोडून दिले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने ठरवले तर अभिनंदन यांना एका आठवड्याच्या आत किंवा १० दिवसांत परत पाठवले जाऊ शकते. सध्या सरकारसमोर वैमानिक अभिनंदन यांना सुरक्षित परत कसे आणि कधी आणायचे याविषयी केला जात आहे . भारतीय राजदूत अभिनंदन यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.