IAF Air Strike : वैमानिक बेपत्ता, पण “त्या व्हिडीवो “ची स्पष्टता नाही : भारत सरकार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळले असून या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. पाकिस्ताननं हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं म्हटलं असून या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचंही रवीश कुमार यांनी सांगितलं. दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार या वैमानिकाचं नाव अभिनंदन वर्थमान असून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. सदर व्हिडीयोची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.
भारतीय हवाई दलाचे एक विमान बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. या विमानाच्या वैमानिकाला जिवंत पकडल्याचा दावा पाकने केला होता. भारतानं मात्र वैमानिक बेपत्ता असल्याच्या वृत्ताला केवळ दुजोरा दिला आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी आर जी के कपूर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाकिस्तानच्या दाव्याची पडताळणी सुरु आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
बुधवारी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. भारताच्या सतर्क हवाई दलाने प्रत्युत्तर देण्याची सुरु करताच पाकचे विमान माघारी फिरले. हवाई दलाने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून यादरम्यान भारताचे मिग २१ हे लढाऊ विमान देखील कोसळले आहे. या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या विमानात अभिनंदन वर्थमान हे वैमानिक होते, असे समजते. दरम्यान, पाकिस्तानने भारतीय वैमानिकाचा कथित व्हिडिओ जारी केला. तसेच त्याचे छायाचित्र आणि त्याच्याकडून जप्त केलेल्या साहित्याचे छायाचित्र जारी केले. व्हिडिओतील व्यक्ती स्वत:चे नाव अभिनंदन असल्याचे सांगत असून हवाई दलात वैमानिक असल्याचे तो सांगत आहे. मात्र, अधिक तपशील सांगता येणार नाही, असे देखील तो चौकशीत स्पष्ट करतो.