Air Strike : भारत पाकिस्तान यांनी संयम ठेवण्याची चीनची विनंती

पाकिस्तानच्या भूमीत घुसून भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, दोन्ही देशांना संयम पाळण्याची विनंती चीनने केली आहे. भारताने दहशतवादाविरुद्धची आपली लढाई ‘आंतरराष्ट्रीय सहकार्याने’ लढावी, असा शहाजोगपणाचा सल्लाही चीनने भारताला दिला आहे. भारताने मंगळवारी पहाटे हवाई हल्ले करून पाकिस्तानमधील ‘जैश-ए-महम्मद’चा सर्वांत मोठा तळ उद्ध्वस्त केल्याच्या वृत्तावर चीनची प्रतिक्रिया विचारली असता, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग म्हणाले, ‘या संदर्भातील बातम्यांची आम्ही दखल घेतली आहे. भारत व पाकिस्तान हे दक्षिण आशियातील महत्त्वाचे देश आहेत. या प्रदेशात शांतता नांदण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सौहार्दाचे संबंध व सहकार्य असणे हिताचे आहे. दोन्ही देश आताच्या परिस्थितीत संयम पाळतील आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे.’
ही दहशतवादी तळांवरील प्रतिबंधक कारवाई होती, या भारताच्या दाव्याबद्दल विचारता, कांग म्हणाले, ‘दहशतवादाविरुद्धची लढाई जगभरात सुरूच आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता असते. भारताने त्यासाठी जगभरात अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज आहे.’पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी पुलवामा हल्ल्यानंतर दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहितीही कांग यांनी यावेळी दिली. ‘यी यांनी कुरेशी यांची बाजू समजावून घेतली आणि त्यानंतर दोन्ही देशांनी शांततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले,’ अशी माहिती कांग यांनी दिली.
भारत, चीन व रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आज, २७ फेब्रुवारीला चीनमधील वुझेन शहरात होत आहे. या बैठकीत सुषमा स्वराज भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मसूद अझरचा मुद्दा या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.