IAF INDIA : भारतीय पायलटला सुखरूप भारताच्या स्वाधीन करा

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलातील पायलटला तत्काळ आणि सुखरूपपणे भारताच्या स्वाधीन करण्यात यावे, अशा स्पष्ट शब्दांत भारताने पाकला ठणकावले आहे. दरम्यान, पाकचे भारतातील उप उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना परराष्ट्र मंत्रालयाने आज सायंकाळी बोलावून घेतले आणि पाकने केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रयत्नांवर भारताने आपला तीव्र आक्षेप नोंदवला.
परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात पाकच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची हमी पाकने द्यायला हवी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
पाककडून भारतीय पायलटचा जखमी अवस्थेतील फोटो जारी करण्यात आला आहे. यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. हे सरळसरळ आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे आणि जीनेव्हा परिषदेतील ठरावाचे उल्लंघन आहे, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हवाई हल्ला चढवला होता. या हल्ल्याने बिथरलेल्या पाकने आज भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने हा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईत पाकचे एक विमान पाडले गेले तर भारतालाही एक विमान गमवावे लागले. पाकच्या हद्दीत पडलेल्या या भारतीय विमानाच्या पायलटला पाकने ताब्यात घेतल्याने स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय पायलटला सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.
आमच्या ताब्यात एकच पायलट: पाक
भारताचे दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावा आज सकाळी पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र आता केवळ एकच भारतीय पायलट आमच्या ताब्यात असल्याचे पाकने स्पष्ट केले आहे. यामुळे पाक पुरता तोंडघशी पडला आहे. विंग कमांडर अभिनंदन आमच्या कस्टडीत असून सैन्याच्या नियमांचे पालन केले जात आहे, असा दावा पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला.