मुख्तार अब्बास नक्वी यांना रॉबर्ट वढेरा सर्कशीतले जोकर वाटतात

–
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राजकीय सर्कशीत जोकरचाच प्रवेश बाकी होता, आता तोही दिसत आहे, अशा शब्दांत त्यांनी वढेरा यांना टोला लगावला आहे. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघात वढेरांच्या उमेदवारीबाबत युवक काँग्रेसने पोस्टर्स लावले आहेत. रॉबर्ट वढेराजी मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तुमचे स्वागत आहे, असे पोस्टरवर म्हटले आहे.
नक्वी पुढे म्हणाले की, रॉबर्ट वढेराजी मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयाचे स्वागत आहे. हे पी-आर (प्रियंका-राहुल) राजकीय सर्कस आहे. या पी-आर राजकीय सकर्शीत जोकरचाच प्रवेश राहिला होता. आता जोकरचा प्रवेशही दिसून येत आहे.
वढेरा यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये उत्तर प्रदेशात काम करण्याचा आपला अनुभव चांगला असल्याचे म्हटले आहे. आपल्यावरील सर्व आरोप संपुष्टात आल्यानंतर मोठ्या भूमिकेत येऊन लोकांच्या सेवेसाठी स्वत:ला समर्पित करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. सध्या ते मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीच्या चौकशीत अडकले आहेत .