Oscar 2019 : भारतीय माहितीपटाच्या पटकावला ऑस्कर पुरस्कार

“पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स ” या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने ‘डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट’ या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर गुणित मोंगा यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला. ‘आम्ही जिंकलो, या पृथ्वीवरील प्रत्येक मुलीने हे ओळखावे की, आपण देवता आहोत. आम्ही @sikhya ला ओळख दिली आहे’, अशा शब्दात मोंगा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मासिक पाळीसाठी ज्यांना पॅड उपलब्ध होत नाहीत अशा दिल्लीजवळील हापूर गावातील महिलांभोवती या माहितीपटाची कहाणी फिरते. पॅड उपलब्ध नसणे ही महिलांसाठी एक गंभीर समस्या आहे. पॅडअभावी मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना आजारांशी सामना करावा लागतो. त्यात त्यांचा मृत्यूही ओढवतो.
या माहितीपटात अनेक पैलू दाखवण्यात आले आहेत. आजारपणाबरोबरच पॅड उपलब्ध नसल्याने अनेक मुली शाळेतही जात नाहीत. अशा स्थितीत त्या गावात पॅड मशीन लावले जाते. यानंतरच गावातील महिलांना पॅडबाबत माहिती मिळते. याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर महिला याबाबत जनजागृती करतात. शिवाय स्वत: पॅड बनवण्याचे व्रत अंगिकारतात. या पुरस्कारामुळे भारतीय माहितीपट सृष्टीत आनंद व्यक्त केला जात आहे .