फेक पोस्टच्या विरुद्ध थेट निवडणूक आयोगाचीच तक्रार

फेक पोस्टच्या विरुद्ध थेट निवडणूक आयोगालाच तक्रार करावी लागली आहे . लोकसभा निवडणुकीत अनिवासी भारतीयांसाठी ऑनलाइन मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याच्या फेक पोस्ट व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर व्हायरल करणाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दणका दिला असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनिवासी भारतीयांना लोकसभा निवडणुकीत ऑनलाइन मतदान करता येणार असल्याच्या फेक पोस्टमध्ये निवडणूक आयोगाचा लोगोही वापरण्यात आला आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आयोगाने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. निवडणूक आयोगाचे सचिव दिलीप के. वर्मा यांनी पोलीस उपायुक्तांकडे ही तक्रार केली आहे. दरम्यान, आयोगाने याबाबत व्हॉट्सअॅप, ट्विटरच्या व्यवस्थापनाशीही संपर्क साधला असून अशा फेक पोस्टना आळा घालण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी केली आहे.