“तिच्या” अंतिम इच्छेनुसार भीक मागून कमावलेले ६.६१ लाख, शहिदांना दान

एक वृद्ध महिला राजस्थानातील अजमेरमध्ये भीक मागून उदरनिर्वाह करत होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिचा मृत्यू झाला. तिने भीक मागून तब्बल ६.६१ लाख रुपये जमा केले होते. तिच्या संरक्षकांनी तिच्या अंतिम इच्छेनुसार, तिची कमाई पुलवामात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या नावे दान केली आहे. नंदिनी शर्मा असं या महिलेचं नाव होतं. तिने बनवलेल्या मृत्यूपत्रात असं नमूद केलं होतं की तिचे पैसे देश आणि समाजकल्याणासाठी उपयोगात आणले जातील. नंदिनी अजमेरच्या बजरंगगड मधील अंबेमाता मंदिराबाहेर भीक मागायची. ती रोज आपले पैसे बँकेत जमा करायची आणि आपल्या मृत्यूनंतर त्या पैशांचं रक्षण करण्यासाठी दोन संरक्षक नेमले होते. नंदिनीच्या संरक्षकांनी तिच्या मृत्यूनंतर योग्य संधीची वाट पाहिली. पुलवामा हल्ल्यानंतर त्यांना वाटलं की ही योग्य संधी आहे. या सैनिकांसाठी पैशांचा उपयोग केल्यात नंदिनीला श्रद्धांजली मिळेल.
अजमेरचे जिल्हाधिकारी विश्व मोहन शर्मा म्हणाले, ‘नंदिनीचे संरक्षक माझ्या कार्यालयात आले आणि ते पैसै मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यास सांगितले, जेणेकरून शहीदांच्या कुटुंबीयांना त्याची मदत होईल. लीगल सेलने औपचारिकता पूर्ण करत पैसे घेऊन त्यांना एक प्रमाणपत्र दिले.’ नंदिनीचे संरक्षक संदीप गौर म्हणाले, ‘भलेही तिची कमाई भीक मागून आली, पण तिला त्या पैशाचा उपयोग देशासाठी करायचा होता.’ अंबे माता मंदिराचे पुजारी म्हणाले, ‘भाविक नेहमी नंदिनीचा सन्मान करायचे, तिला फळं, कपडे, पैसै द्यायचे. जे नियमित यायचे त्यांना नंदिनीविषयी ठाऊक होतं. ती बँकेत पैसै जमा करते हेही अनेकांना माहित होतं.’