‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना अटक : सोपोरमध्ये एकाचा खात्मा

उत्तर प्रदेशातील एटीएसने सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. देवबंदस्थित एका वसतिगृहात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. शाहनवाझ अहमद तेली आणि आकिब अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. शाहनवाझ जम्मू-काश्मीरच्या कुलगामचा आहे, तर आकिब हा पुलवामातील रहिवासी आहे. सूत्रांनुसार, ब्रेन वॉश करून ‘जैश’ या दहशतवादी संघटनेत भरती करता येतील, अशा तरुणांच्या शोधात हे दोघे उत्तर प्रदेशात आले होते. याआधीही ते अनेकदा देवबंद आणि राज्यातील इतर भागात आले होते. आकिब पहिल्यांदा जानेवारीत एटीएसच्या रडारवर आला होता .
एटीएसच्या माहितीनुसार, या संशयितांच्या फोनमधून ‘जैश’शी संबंधित व्हिडिओ आणि फोटो मिळाले आहेत. त्यांचा संबंध ‘जैश’शी असू शकतो, असा एटीएसला संशय आहे. शाहनवाझच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येऊ शकते. तसंच पुलवामा हल्लाप्रकरणी तपास करणाऱ्या संस्थांनाही त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग होऊ शकतो, असंही सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं आज एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर सोपोरसह आसपासच्या परिसरातील मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सोपोरमधील वारपोरा गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. दहशतवादी असलेल्या ठिकाणाला जवानांनी चारी बाजूंनी घेरले. आपण घेरलो गेल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात एक दहशतवादी मारला गेला. मात्र, आणखी काही दहशतवादी या गावात असून चकमक अद्याप सुरू आहे.