गडकरींनी केली पाणीबाणीची घोषणा : पाकला अतिरिक्त पाणी नाही

पाकिस्तानात जाणारं व्यास, रावी आणि सतलज नद्यांचं भारताच्या वाट्याचं अतिरिक्त पाणी रोखण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. या तीन्ही नद्यांवर उभारलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आता पाकिस्तानला दिले जाणारे अतिरिक्त पाणी पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या नद्यांमध्ये वळवण्यात येईल, असे गडकरींनी नमूद केले. ‘जम्मू-काश्मीरमधील शाहपूर-कांडी येथे रावी नदीवर प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. याशिवाय उझ प्रकल्पात जम्मू- काश्मीरमधील रावी नदीचे पाणी साठवले जाईल आणि या धरणाचं अतिरिक्त पाणी अन्य राज्यांत प्रवाहित केलं जाईल,’ अशी माहिती गडकरी यांनी दिली.
या घोषणेपूर्वी मंगळवारी बागपत येथील एका कार्यक्रमासाठी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानला तीन-तीन नद्यांचे पाणी वापरण्याची परवानगी मिळाली होती. सिंधू जलकरारानंतरही भारतातून वाहणाऱ्या या तीन नद्यांचे पाणी आतापर्यंत पाकिस्तानात जात होते. आता आम्ही या तिन्ही नद्यांवर प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे यापुढे या नद्यांचे अतिरिक्त पाणी पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी वापरले जाईल. हे पाणी वळवल्यानंतर यमुनेच्या पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या व्यास, रावी आणि सतलज नद्यांच्या पाण्याबाबत १९६० मध्ये ‘सिंधू जल करार’ झाला होता. या करारानुसार, भारताला ३.३ कोटी एकर फूट (एमएएफ) पाणी मिळाले आहे तर पाकिस्तानला ८० एमएएफ पाणी देण्यात आले आहे.