किन्नोर-तिबेट सीमेवर हिमस्खलन होऊन सहा जवान ठार : बचावकार्य जारी

पुलवामा हल्याचे प्रकरण ताजे असतानाच हिमाचल प्रदेशातील किन्नोर-तिबेट सीमेवर हिमस्खलन होऊन सहा जवान ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. भारत-चीन सीमेवरील शिपकला भागानजीक बुधवारी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. याच ठिकाणी इंडो-तिबेटियन दलाचे आणखी काही जवान गाडले गेले असावेत,अशी शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. वातावरणात सतत बदल होत असल्यानं लष्कराला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्व जवान जम्मू-काश्मीर रायफल्सचे असून, एका जवानाचा मृतदेह सापडला आहे. त्यांचे नाव रमेश कुमार (वय ४१) आहे. तसेच अन्य पाच जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, ते मरण पावल्याची भीती असल्याची माहिती किन्नौरचे उपायुक्त गोपाल चंद यांनी दिली. १६ जवान गस्त घालत होते त्यावेळी हिमस्खलन झाले. घटनास्थळी सैन्यदल, पोलिसांचे मिळून १५० जणांचे पथक बचावकार्य करत आहे.