अखेर शिवसेना-भाजप युती झाली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली.
भाजप आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी २३ जागा शिवसेना तर २५ जागा भाजप लढेल. विधानसभेच्या जागावाटपाबाबत भाजप मित्रपक्षांशी चर्चा करेल. त्यांना सोडून ज्या जागा राहतील त्यात शिवसेना-भाजप निम्म्या-निम्म्या जागांवर लढेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-भाजप हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये २५ वर्षांपासून युती असून काही मतभेद असले तरी आमचा मूळ विचार सारखा राहिलेला आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा एकदिलाने एकत्र येत आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काही कारणाने आम्ही एकत्र राहू शकलो नाही. त्यानंतर साडेचार वर्षे आम्ही एकत्रपणे सरकार चालवतो आहोत. आता काही पक्ष एकत्र येऊन राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत असताना हे आव्हान परतवून लावण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सत्ता, पदे यापुरती ही युती मर्यादित नसून त्यापलीकडे जाऊन व्यापक देशहित डोळ्यापुढे ठेऊन ही युती झाली आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी अनेक मुद्दे मांडले. शेतकरी, सामान्य माणसं, गरिबांचं हित जपण्याचा त्यांचा आग्रह राहिला. अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी, ही त्यांची मागणी होती. या मागणीचे पूर्ण समर्थन भाजप करत आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने आधीच अयोध्येतील अविवादित ६३ एकर जमीन मंदिर न्यासाला देण्याचा निर्णय घेऊन मंदिराचा मार्ग सुकर केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
व्यापक देशहित समोर ठेऊन आम्ही युतीचा निर्णय घेतला असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर निश्चितपणे पुन्हा एकदा एनडीएचं सरकार केंद्रात येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष पुन्हा मनसे एकत्र आले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणताच पत्रकार परिषदेत हास्यस्फोट झाला. त्यावर लगेचच तुमच्या मनात जे मनसे आहे ते मला म्हणायचे नाही हे मनसे म्हणजे दिलसे असे समजावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वरळी सीफेस येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते मनोहर जोशी, अनंत गिते, आदित्य ठाकरे उपस्थित होते. दरम्यान, मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सर्वप्रथम सोफिटेल हॉटेलमध्ये भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची कल्पना भाजप नेत्यांना देण्यात आली.
शिवसेना-भाजप युतीची अधिकृत घोषणा होण्याआधी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वारी केली. भाजप नेत्यांसोबत सोफिटेल हॉटेलमध्ये चर्चा केल्यानंतर शहा तडक ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत विस्ताराने चर्चा झाली. त्यानंतर शहा, उद्धव, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेसाठी ब्ल्यू सी हॉटेलकडे रवाना झाले.