“जैश”च्या टॉप कमांडर्सना कंठस्नान : मेजरसह चार जण शाहिद

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे काल रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत जैश-ए -मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून या कारवाईत मेजरसह चार जवान शहीद झाले असल्याचे वृत्त आहे. तर या चकमकीत जम्मू-काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक अमित कुमार आणि सैन्याचे ब्रिगेडियर यांच्यासह अनेक सैनिक जखमी झाले आहेत. चकमक सुरू असलेल्या पिंगलेना गावात सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्स आणि निमलष्करी दलाच्या पथकाने ज्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले त्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन टॉप कमांडर्सचाही समावेश आहे. तब्बल १८ तासापासून ही झुंज चालू होती.
डीआयजी अमित कुमार यांच्या पोटाला क्रॉस फायरिंगमध्ये एक गोळी लागली तर अन्य एका अधिकाऱ्यांच्या पायाला गोळी लागली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हेलिकॉप्टरने उपचारांसाठी दिल्लीला पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे. या घटनेनंतर सैन्याच्या एका ब्रिगेडियरनादेखील पोटात गोळी लागली. त्यांना श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पिंगलेना गावात सोमवार सकाळपासूनच दगडफेक सुरू होती. परिणामी सीआरपीएफच्या पथकांना येथे सैन्याच्या ऑपरेशनदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेसाठी तैनात करण्यात आलं होतं.
उपलब्ध माहितीनुसार, पुलवामामध्ये झालेल्या या ऑपरेशनच्या वेळी पिंगलेना गावात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या भागात सीआरपीएफची अनेक पथके तैनात करण्यात आली होती. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए -मोहम्मदच्या टॉप कमांडर्सना भारतीय जवानांनी सकाळी कंठस्नान घातले. सायंकाळी त्यांचा तिसरा साथीही ठार करण्यात आला. रविवारी सकाळी याच कारवाईत सैन्याचे एक मेजर आणि तीन जवान शहीद झाले. चकमकीच्या वेळी सैन्य आणि पोलिसांची अनेक पथके सोमवारी दुपारी तैनात करण्यात आली होती. दुपारनंतर या कारवाईत पुलवामाचे एसएसपी, दक्षिण काश्मीरचे डीआयजी यांच्यासह सीआरपीएफ आणि लष्कराचे अनेक अधिकारीही सामील झाले होते.