चौकीदाराच्या चोरीमध्ये आता सत्तेसाठी लाचार शिवसेना : अशोक चव्हाण

चौकीदाराच्या चोरीमध्ये आता सत्तेसाठी लाचार शिवसेना ही भागीदार झाली असल्याचे टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली . मातोश्रीवर येऊन अमित शाह यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून वाघाचे दात घशात घातले आणि सत्तेसाठी लाचार वाघाने आज उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार अफजल खानासमोर गोंडा घोळलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेने भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांवर एक पुस्तिका काढली होती. आज त्या पुस्तीकेच्या पानाची कागदी फुले तयार करून त्याचे तोरण अमित शाह यांच्या स्वागतासाठी मातोश्रींच्या दारावर लावले असल्याचा टोला चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले .
खासदार अशोक चव्हाण पुढे म्हणाले कि , शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा केली होती. युती गेली चुलीत असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंनी स्वतःचा स्वाभिमान चुलीत घातला आहे आणि भाजपासमोर लोटांगण घातले असल्याचे त्यांनी सांगितले. मला फसवणूक झालेल्या या शिवसैनिकांबद्दल सहानुभूती असून सत्तेच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तरी मोदींचे सरकार घालवण्यातच देशाचे आणि महाराष्ट्राचे हित आहे हे जाणणारा सामान्य शिवसैनिकही मोदींच्या विरोधात काँग्रेस आघाडीला मतदान करतील असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
राज्यातील १७ हजार शेतक-यांच्या आत्महत्यांना भाजपासोबत शिवसेना ही जबाबदार आहे. गेल्या साडेचार वर्षात भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांनी राज्याचे वाटोळे केले आहे. कुपोषणामुळे झालेल्या हजारो बालकांच्या मृत्यूला भाजपाइतकीच शिवसेना ही जबाबदार आहे. आपण दोघे भाऊ महाराष्ट्राला लुटून खाऊ अशा पद्धतीने या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राला लुटले असल्याचा आरोप त्यांनी केला.