महाआघाडीत आंबेडकरांना ४ , राजू शेट्टी २ तर माकपला १ जागा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना सोबत घेण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून ‘महाआघाडी’तील जागावाटपाचं सूत्रही निश्चित झाल्याची माहिती आहे . विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी आज काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महाआघाडीच्या जागावाटपावर विस्ताराने चर्चा करण्यात आली. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला चार जागा, राजू शेट्टी यांच्या संघटनेला दोन जागा आणि माकपला एक जागा सोडण्यावर सर्व नेत्यांचं एकमत झाल्याचे समजते. या बैठकीला विखेंसह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते.
दरम्यान अजित पवार-राज ठाकरे यांच्या भेटीनंतर झालेल्या या बैठकीत अपेक्षेप्रमाणे मनसेला आघाडीत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ठेवण्यात आला. त्यावर याबाबत दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.