स्वतंत्र विदर्भाच्या घोषणांनी दणाणले : भाजप काँग्रेसवर हल्ला

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला बळ मिळावे तसेच निवडणुकीतून प्रस्थापित पक्ष व नेत्यांना आव्हान देण्यासाठी विदर्भ निर्माण महामंचची सभा शनिवारी संविधान चौकात झाली. पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यांच्या या सभेत महामंचचे सर्व अकराही घटक पक्षांचे नेते सहभागी झाले. यावेळी वक्त्यांनी भाजप व काँग्रेसला लक्ष्य केले. ‘ले के रहेंगे, ले के रहेंगे, विदर्भ राज लेकर रहेंगे’, ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
‘चोट्ट्यांवर विश्वास ठेवायचा असेल तर खुशाल भाजप, काँग्रेसला मतदान करा. पण, ते वैदर्भीयांचे भाग्य बदलवू शकत नाही. त्यामुळे या ‘चोट्ट्यां’ना मतदान करणार का’, असा घणाघात विदर्भ राज्य पार्टीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी केला.
वेगळे राज्य मिळवून देतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खोटे बोलले. आपल्याला बदल आणण्यासाठी या सर्वांना हाकलण्याचे काम करावे लागेल. त्यासाठी निवडणुका हा एकमेव मार्ग आहे. आम्ही लढण्याचा निर्धार केला असून, त्याची सुरुवात करत आहोत. आपले राज्य हवे असल्यास काँग्रेस वा भाजपचा चेहरा का बघता? या पक्षांचे मायबाप दिल्ली, मुंबईत बसून शेळ्या हाकतात. छत्रपती शिवाजी महाराजांची मक्तेदारी पश्चिम महाराष्ट्राची नाही तर आमचेही दैवत आहे, असेही श्रीहरी अणे यांनी ठणकावले.
भाजप असो वा काँग्रेस, विदर्भाला न्याय देऊ शकत नाही. विदर्भाच्या या स्थितीसाठी दोन्ही पक्ष दोषी आहेत. वेगळ्या राज्याची मागणी आक्रमकपणे मांडत राहा, आम आदमी पक्ष पूर्णत: पाठिशी राहील, अशी ग्वाही ‘आप’चे दिल्लीतील समाजकल्याणमंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी दिली. यावेळी ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अॅड. वामनराव चटप, विदर्भ माझाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे, बीआरएसपीचे अॅड. सुरेश माने, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू, जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे, महामंचचे समन्वयक राम नेवले, ज्वाला धोटे यांनी भाजप व काँग्रेसवर हल्ला चढवला. विदर्भ महामंच हा तिसरा नाही तर, पहिला पर्याय असल्याने येणाऱ्या काळात मतदारांनी मतपेटीतून शक्ती दाखवावी, असे आवाहन या वक्त्यांनी केले. संचालन देवेंद्र वानखडे यांनी केले. पुढची सभा १४ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे सभा होईल. यानंतर ३ मार्चला कस्तुरचंद पार्कवर सभा आयोजित करण्याचे अॅड. सुरेश माने यांनी जाहीर केले.