थंडीने गारठून नाशिकमध्ये २ मृत्यू

महाराष्ट्र गारठला
उत्तरेकडील राज्यांकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला. मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातही तापमानाचा पारा घसरल्याने राज्याला हुडहुडी भरली. राज्यातील नीचांकी तापमान ४ अंश सेल्सिअस नाशिकमध्ये नोंदविण्यात आले, तर पुण्यात या हंगामातील नीचांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये दोन वृध्दांचा थंडीने गारठून मृत्यू झाला आहे. अजून एक ते दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वातावरणातील बदलांमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून, त्याचा परिणाम इतर राज्यांवर होतो आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव होता, त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ वातावरण होते. परिणामी थंडी गायब होऊन तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली होती. मात्र, दोन दिवसांपासून या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा कमी झाला आहे, त्याच वेळी उत्तरेकडील बोचऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने शुक्रवारी संध्याकाळनंतर महाराष्ट्र थंडीने गारठला. अजून एक ते दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. मात्र, सोमवार आणि मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची शनिवारी नाशिकमध्ये नोंद झाली. निफाडमध्ये दवबिंदू गोठले असून नाशिकमध्येही गोदाघाटावर दोन बेघर वृध्दांचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. थंडीचा जोर उद्यापर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये ८.० तर नगरमध्ये ६.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.