MumbaiSTStrikeUpdate : पडळकर -खोतांचा आझाद मैदानात मुक्काम , उद्या घोषित करणार भूमिका

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत मोठी घोषणा केल्यानंतर आंदोलनाचं नेतृत्व करणारे विरोधी पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर जात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्यांनी वेगळं मत मांडू नये. जो निर्णय घ्यायचा आहे तो विचार करून घ्यायचा आहे. सकाळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्णय घेऊ अशी माहिती दिली.
यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांना माहिती देताना गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकारसोबत आज आमची बैठक झाली. परंतु कर्मचाऱ्यांसोबत रात्रभर चर्चा करू. आजचा मुक्काम आझाद मैदानात करू उद्या संपावर निर्णय घेऊ. सरकारने दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तर ऐकून घेतला. आझाद मैदानात कर्मचाऱ्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करू असे आम्ही पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान आम्हाला पगारवाढ नाही तर विलिनीकरण हवंय. पगाराची खात्री नाही म्हणून विलिनीकरण करावं हीच मागणी आमची ठाम आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. पगारवाढीला आमची मान्यता नाही. ४२ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी सरकार कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे. पगारवाढीच्या बातम्या आल्यानंतरही कर्मचाऱ्यांची नाराजी पसरली असल्याचं चित्र आझाद मैदानात पाहायला मिळालं.
अनिल परब यांच्यासोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे देखील होते. त्यांनी या पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी साडेसात वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडू सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आझाद मैदानात दाखल होत भूमिका मांडली. कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एक दिवस लागेल, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही उद्या सकाळी आपला निर्णय जाहीर करु, असं खोत यांनी स्पष्ट केलं. तसेच कुणीही वैयक्तिक मत मांडू नये, असं आवाहन यावेळी सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांना केलं.
आंदोलकांची भूमिका मांडताना सदाभाऊ खोत म्हणाले कि , “मंत्री अनिल परबांची भूमिका आम्ही सविस्तर ऐकून घेतली. परबांनी दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तरपणे ऐकून घेतला. त्यानंतर आझाद मैदानावर त्यांच्या प्रस्तावावर आम्ही कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करु. आपण चर्चा करुन निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे कुणीही वेगळं मत मांडू नये. कारण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय विचार करुन सर्व मिळून निर्णय घेऊ. रात्री निर्णय झाला की सकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ”.