MaharashtraNewsUpdate : ऑनलाईन अडचणी लक्षात घेऊन जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आता ऑफलाईन सुविधा

पुणे : तांत्रिक अडचणीमुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीचा वेग मंदावल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यात अडचणी येत आहेत. हि अडचण लक्षात घेऊन आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (Barti) घेतला आहे.
राज्यात दि. १६ नोव्हेंबर पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, ऑनलाईन प्रणालीवरील ताण वाढल्याने वेग मंदावला आहे. त्यामुळे विविध जिल्हयांतून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडूनही ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीसाठी बार्टीकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु असून त्यासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची गरज असते. त्यामुळे अर्जदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने अर्ज भरता येणार असल्याचे बार्टीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.बार्टीने दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणासाठीच स्वीकारण्यात येतील. तसेच अशा सूचना सर्व जातपडताळणी समित्यांनाही बार्टीमार्फत १७ नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आली आहे.