MaharashtraEducationUpdate : परीक्षा तर होणारच !! पण केंव्हा ? कशी ? कुठे ? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी महत्वाचा निर्णय घेतला आहे . त्यानुसार सप्टेंबरमध्ये अभ्यास णि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिवाय या परीक्षा बाहेर न घेता त्या शक्यतो ऑनलाईन घेतल्या जातील असेही शिक्षणमंत्री म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांवर कुठलाही मानसिक दबाव येऊ नये यासाठी कमी गुणांची परीक्षा हि असेल. सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा करून परीक्षेची तारीख ठरविण्याचे किंवा ती न घेण्याचे स्वातंत्र्य राज्यांना दिले असले तरी आता परीक्षा मात्र होणारच असे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सामंत पुढे म्हणाले कि , “युजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. युजीसीने ही मागणी मान्य करावी यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा आणि तशी विनंती यूजीसीकडे करावी अशी सूचना कऱण्यात आली आहे”. दरम्यान “मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन बुधवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर कुलगुरुंनी केलेल्या विनंतीप्रमाणे मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत,” अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.
पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्याासासाठी दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेचा निकाल काही विद्यापीठ ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील. तर काही विद्यापीठ १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार नाही यासंबंधी कुलगुरुंकडे विनंती करण्यात आली असून त्यावरही चर्चा झाली. विद्यार्थ्यांना शारिरीक आणि मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे अशी पुन्हा विनंती कऱण्यात आली. त्यानुसार सुहास पेडणेकर समिती चांगल्या पद्धतीनं काम करत असून कार्यवाही करत आहे,” असेही उदय सामंत यांनी सांगितले.
“कुलगुरु आणि समितीच्या लोकांनी बैठक आणि चर्चेसाठी अजून एक दिवस देण्याची विनंती केली आहे. परीक्षा कशी पद्धतीने घ्याव्या लागतील यासाठी बुधवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर सरकारकडे दुसरा प्रस्ताव सादर केला जाणार आहे,” असं उदय सामंत यांनी सांगितलं. “विद्यार्थी घराबाहेर पडणार नाही, घरातच परीक्षा देता आली पाहिजे यावर कुलगुरुंच एकमत झालं आहे. ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची कोरोना संकटात परीक्षा घेणं फार जिकीरीचं काम आहे. मात्र कुलगुरु हे योग्य पद्धतीने पार पडेल याबद्दल आशा आहे,” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी विविध विषयांबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. दोन संचालक सुद्धा या समितीत आहेत. या समितीची आज पार पडलेल्या बैठकीत बहुतांश विद्यापीठांच्या कुलगुरुंनी परीक्षेसाठी मुदतवाढ मागितली, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.