Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ChandrakantPatilNewsUpdate : भाजप नेत्यांना झालंय काय ? चंद्रकांत पाटील यांच्याविषयी राज्यात संताप …

Spread the love

औरंगाबाद : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असे विधान केल्याचे व्हायरल होताच त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात असून आपल्या या वक्तव्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे . गेल्या काही दिवसांपासून भाजपनेत्यांकडून महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली जात असल्याने संतापाची लाट उसळलेली असतानाच पाटील यांचे हे वक्तव्य आले आहे.


अलिकडेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे ते ट्रोल होत असतानाच आता आणखी एक नवा वाद सुरु झाला आहे. भाजपा नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागीतली होती.” असे वक्तव्य केल्याची त्यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका होत आहे. या वक्तव्यामुळे राज्यात आता मोठा वाद होण्याची चिन्ह आहेत. त्यांच्या आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी , प्रसाद लाड, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळं निर्माण झालेला वाद नवीन असताना अजून एक वाद निर्माण झाला आहे.पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाटील यांच्यावर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा युक्तिवाद

दरम्यान याबाबत खुलासा करताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की , “मला असं वाटतं की तुमच्या(प्रसारमाध्यम) माध्यमातून मी काय म्हटलं हे मी सांगण्यापेक्षा लाईव्ह सगळ्यांनी पाहीलं असेल, की ज्यामध्ये. शाळा कोणी सुरू केल्या? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीरभाऊराव पाटील, महात्मा फुलेंनी सुरू केल्या आणि मग त्या शाळा सुरू करताना, ते शासकीय अनुदानावर अवलंबुन राहिले नाहीत, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. भीक म्हणजे काय आताच्या भाषेत सीएसआर, वर्गणी, देणग्या म्हणूयात. पण आपण साधरणपणे असं म्हणतो की, दारोदार भीक मागितली आणि मी माझी संस्था वाढवली.”

आता सीएसआर ज्याला म्हणतो, कंपनीच्या नफ्याच्या २ टक्के खर्च केली जाते, ५ कोटींपेक्षा अधिक नफा असलेल्या कंपन्यांना निधी सामाजिक कामासाठी खर्च करावा लागतो, हा कायदा झाला आहे. आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागू पण मंदिरं ज्यावेळी उभी करतो त्यावेळी सरकारकडे पैसे मागतो का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

अमोल मिटकरी यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसहभागातून, लोकवर्गणीतून आणि स्वत: कडे असलेला पैसा शाळांसाठी खर्च केला. महापुरुषांनी भीक मागितली नाही, भीक मागितल्याचं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा अपमान केला आहे, असं मिटकरी म्हणाले. संस्थाचालकांना भीक मागा असा अजब सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जनतेनं पाटील यांच्या वक्तव्याची दखल गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!