GovernerNewsUpdate : एकीकडे राज्यपालांना दिल्लीचं बोलावणं … तर दुसरीकडे हायकोर्टात जनहित याचिका …

मुंबई : सतत वादग्रस्त विधानांमुळे गाजत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना २४ आणि २५ तारखेला दिल्लीला बोलावण्यात आले असल्याचे वृत्त आहे. यावेळी ते नेमके कोणाला भेटणार, याचा मात्र खुलासा होऊ शकलेला नाही. राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दिल्ली दौरा असा कयास आहे.
दरम्यान भगतसिंह कोश्यारी यांचा दिल्ली दौरा नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कोश्यारी यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. त्यांनी औरंगाबाद येथे विद्यापीठाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षासह विविध पक्ष संघटननी निषेध व्यक्त करीत आंदोलन सुरु केले आहे.
राज्यपालांच्या विरोधात जनहित याचिका
केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करत भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. तर दुसरीकडे कोश्यारी यांच्याविरोधात आता मुंबई हायकोर्टात एक फौजदारी जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. समाजातील शांतता आणि एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत राज्यपालांना पदावरून हटवा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका दीपक जगदेव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत दाखल केली आहे.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते …
“आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील.”
दरम्यान राज्यपालांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी म्हटले होते की , या जगात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळ्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत बोलायचे तर आमचे आजचे हिरो हे शिवाजी महाराज हेच आहेत. कोणाच्याही मनात याबाबत शंका नाही. मला वाटत नाही की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मनातही याबाबत काही शंका असेल. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. पण त्यांचा मनात तसा कुठलाही भाव नव्हता.