CourtNewsUpdate : “त्या” १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना दिले हे आदेश …

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबरमध्ये घेण्याचं निश्चित केले आहे. तोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदार नियुक्तीसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये हा २७ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश कायम ठेवण्यात आला आहे.
नाशिक येथील रतन सोली लुथ यांनी हायकोर्टाने १३ ऑगस्ट २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्या अपिलावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत राज्यपालांनी त्यांची बाजू न मांडल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे. न्यायमूर्ती के. एम. जोसेफव न्यायमर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी सुरु आहे.
दरम्यान राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय राज्यपालांनी घेऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीच्या प्रश्नावरील अपिल आधीच प्रलंबित असताना आता नवी यादी पाठवली जाण्याची शक्यता असल्याचे अपिलकर्त्यांनी निदर्शनास आणल्याने सर्वोच्च न्यायलयाने हा आदेश दिला होता.
आजच्या सुनावणीच्यावेळी राज्यपालांकडून त्यांचे म्हणणे सादर करण्यात न आल्याने सुनावणी लांबणीवर पडली असून आता पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर २०२० मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ सदस्यांनी नावे विधानपरिषदेवर नामनिर्देशित करण्यासाठी पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी ती मंजूर केली नव्हती. दरम्यान एकनाथ शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर ती यादी परत मागवण्यात आली होती. याचाही उल्लेख सर्वोच्च न्यायालयातील मागील सुनावणी वेळी करण्यात आला होता.
वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील विधानपरिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ इतकी आहे. त्यापैकी १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर करतात.