EknathShindeNewsUpdate : मुख्यमंत्र्यांचे भाषण जोरात , गर्दीही मोठी पण भाषण न ऐकताच कार्यकर्ते निघाले घरी ….

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियोजित वेळेत आपले भाषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपनेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेचे बाण सोडून खोक्यांचे प्रतीकात्मक दहन केले. या दोन्हीही सभा आज महाराष्ट्राचे आकर्षण होते. दरम्यान बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ उद्धव ठाकरे यांच्यावर धडाडत असतानाच सभेसाठी जमलेले कार्यकर्ते उठून घरी निघाल्याचे दिसून आले.
सभेसाठी आलेले लोक कालपासून प्रवासात आहेत. अनेकजण दुपारी मैदानात दाखल झाले आहे. मात्र, सभा लांबत आहे. तसेच मैदान पूर्ण भरल्याने अनेकांना बाहेर रस्त्यावर उभे राहून सभा ऐकावी लागत आहे. त्यातून शिंदे यांचे भाषण ऐकण्यापूर्वीच लोकांनी मैदान सोडल्याचे दिसत होते. मटा ऑनलाईन ने व्हिडीओ आणि फोटोसह हे वृत्त दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांचं भाषण अंतिम टप्प्यात असताना भाषणाला सुरुवात केली. त्यांच्या आधी अनेकांनी आपले भाषण इतके लांबवले कि , भाषण थांबवा म्हणून चिट्ठ्या देण्याची वेळ आली. त्यामुळे दुपारपासून आलेले लोक सभा लांबू लागल्याने मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्याआधीच घराची वाट धरली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तीन नातेवाईकांनी हजेरी लावली. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे , जयदेव ठाकरे यांच्या घटस्फोटित पत्नी स्मिता ठाकरे आणि बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे यांनी शिंदेंच्या मेळाव्याला हजेरी लावली. याशिवाय आनंद दिघे यांच्या भगिनीने आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक थापा यानेही शिंदेंना साथ दिली.
एकनाथ माझा आवडीचा..
“एकनाथ माझा आवडीचा.. आता ते मुख्यमंत्री झालेत… म्हणून एकनाथराव म्हणतो, गेल्या काही दिवसात मला बरेच फोन येत होते, की तुम्ही शिंदे गटात गेलात का? पण हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही, असं जयदेव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. एकनाथ शिंदेंच्या दोन चार भूमिका मला आवडल्या. धडाडीचा माणूस आपल्याला हवाय, त्याच्या प्रेमासाठी आलोय, असं जयदेव ठाकरे म्हणाले.
आपला इतिहास आहे, चिपळ्या वाजवणारा एकनाथ, त्यांना जवळच्यांनी संपवलं. पण यांना (एकनाथ शिंदे) एकटं पाडू नका, एकटा नाथ होऊ देऊ नका, एकनाथ राहू द्या, तुम्हाला विनंती आहे, अशी भावनिक साद जयदेव ठाकरेंनी घातली. हे सगळं बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्या, असं आवाहनही जयदेव ठाकरे यांनी केलं.
शिंदे यांनी आपल्या धुव्वाधार भाषणात ठाकरेंवर केले प्रहार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत घेतलेल्या दसरा मेळाव्यातून हिंदुत्वासह अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. तसंच शिवाजी पार्कच्या मैदानावरून झालेल्या वादंगाबाबत भाष्य करत एक नवा गौप्यस्फोट केला. ‘तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, मी आधीच ठरवलं होतं की शिवाजी पार्कचं मैदान त्यांना सभेसाठी देण्यामध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिलेला, मैदान आम्हालाही मिळालं असतं, पण मी या राज्याचा मुख्यमंत्री असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मैदान जरी त्यांना मिळालं असलं तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार मात्र आमच्यासोबत आहेत,’ असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
बीकेसी मैदानात घेतलेल्या दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ‘शिवसेनाप्रमुखांची परंपरा तुम्ही मोडून काढली, त्यांच्या विचारांना मूठमाती तुम्ही दिली. मग त्या शिवाजी पार्कवर उभं राहण्याचा तरी नैतिक अधिकार तुम्हाला आहे का?’ असा सवालही शिंदे यांनी विचारला आहे. तसंच हजारो शिवसैनिकांनी आपला घाम आणि रक्त सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी गहाण ठेवला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे, पण तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीकडे देऊन टाकला, असा हल्लाबोलही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
‘आम्ही घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेला पाठिंबा मिळतोय, मला तर या सभेतील शेवटचा माणूसही दिसत नाही. खरी शिवसेना कुठे आहे, याचं उत्तर या महासागराने सगळ्या हिंदुस्थानाला दिलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कुठे आहेत, हे सगळ्यांना आता कळालं असेल,’ अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.