Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RajasthanCongressCrisisUpdate : मुख्यमंत्री गहलोत पाठोपाठ सचिन पायलट यांनीही घेतली सोनिया गांधी यांची भेट …

Spread the love

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, त्यांनी त्यांच्या भावना आणि प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्याचबरोबर पक्षाध्यक्ष राज्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना ते  म्हणाले कि , “काँग्रेस अध्यक्षांनी आमचे ऐकले. राजस्थानातील घडामोडींवर चर्चा झाली. आमच्या भावना मी सोनिया गांधीजींना कळवल्या आहेत. आम्हाला फक्त २०२३ च्या विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी एकत्र काम करावे लागेल. आणि मला खात्री आहे की राजस्थानमध्ये आम्ही कठोर परिश्रम करून पुन्हा सरकार बनवू. राजस्थानमध्ये पाच वर्षे काँग्रेस आणि पाच वर्षे भाजप आहे. यावेळी ही परंपरा मोडावी लागणार आहे.

सोनिया गांधी सकारत्मक निर्णय घेतील…

राजस्थानमधील राजकीय परिस्थितीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, राजस्थानच्या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तो सोनिया गांधीच घेतील. दुसरीकडे, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी येत्या एक-दोन दिवसांत राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील.


दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही आदल्या दिवशी सोनिया गांधी यांची भेट घेतली. जयपूरमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकल्याने त्यांनी सोनियांची माफी मागितली तसेच आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचेही गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपण मुख्यमंत्रीपदी राहायचे की नाही याचा निर्णय सुद्धा सोनिया गांधीच  घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पी. चिदंबरम यांची प्रतिक्रिया

राजस्थानमधील परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पी . चिदंबरम यांनी म्हटले आहे कि , राजस्थानची परिस्थिती  अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती. मात्र त्यांनी  यावेळी अशोक गेहलोत यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप करणे टाळले. पी चिदंबरम म्हणाले की, गेहलोत हे खरे काँग्रेसवाले आहेत आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहतील.


पी चिदंबरम पुढे म्हणाले की, अशोक गेहलोत सध्या राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. ते पद सोडेपर्यंत कोणतीही जागा रिक्त नाही. ते पुढे म्हणाले की, ते हे पद सोडतील असे मी म्हणू शकत नाही. मला वाटते की ते मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी पुन्हा एकदा राजस्थानच्या निवडणुका जिंकतील. येत्या १६, १७ महिन्यांत राजस्थानमध्ये निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकीतही पक्षाचे नेतृत्व करू शकणार्‍या ज्येष्ठ नेत्यालाच राजस्थानचे प्रभारी बनवायला हवे.

दरम्यान सचिन पायलटला मुख्यमंत्री बनवायचे की नाही, या प्रश्नावर चिदंबरम म्हणाले की, सचिन पायलटला किती आमदार पाठिंबा देतील हे मला माहीत नाही. मला वाटतं मुख्यमंत्रीपदाच्या कोणत्याही उमेदवाराला चांगल्या संख्येने आमदारांचा पाठिंबा असायला हवा. ही एक सामान्य गोष्ट आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!