Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalControversy : शिवसेना विरुद्ध शिंदे गट , घटनापीठासमोरील पुढील सुनावणीची तारीख निश्चित …

Spread the love

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील ज्या खटल्याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या राजकारण्यांचे लक्ष लागलेले आहे त्या शिवसेना बंडखोरांशी संबंधित खटल्यावर सुप्रीम कोर्टात २७ सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्राच्या राजकीय महाभारताचे  प्रकरण मागील दोन महिन्यांपासून सुरु आहे. यापूर्वीच्या सुनावणीत २७ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मंगळवारी दुसऱ्या क्रमांकावर हे बहुचर्चित प्रकरण घेतले जाणार आहे.


न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षते खालील न्यायमूर्ती एम. आर.शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंहा या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे हि सुनावणी होणार आहे.  ७ सप्टेंबरला यावर केवळ  १० मिनिटांची सुनावणी झाली होती. त्या सुनावणीत घटनापीठाने  निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते.

मागील सुनावणीत शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी घटनापीठापुढं युक्तिवाद केला होता. तर, शिंदे गटाकडून गेल्या सुनावणीत शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली होती. त्यावर अभिषेक मनू सिंघवी यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अगोदर निर्णय घेण्याची मागणी केली होती. शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने बंडखोर १६ आमदारांना निलंबित करावे, अशी याचिका केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने १६ आमदारांच्या निलंबनाच्या नोटीस विरोधात याचिका दाखल केली आहे.

मूळ याचिकेबरोबरच  शिवसेनेने  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला दिलेल्या मान्यतेला विरोध करणारी याचिका, विधानसभेचे अधिवेशन अवैध होते, असा दावा करणारी याचिकाही सुप्रीम कोर्टात दाखल केली असून या सर्व याचिकांवर घटनापीठापुढे  सुनावणी सुरु आहे. दुसरीकडे शिंदे गटाने  निवडणूक आयोगाच्या कामकाजाला परवानगी द्यावी आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवावे  अशी मागणी केली आहे. तर,  शिवसेनेनं पहिल्यांदा आमदारांच्या निलंबनावर सुनावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे २७ सप्टेंबरला नेमक्या कोणत्या मुद्यावर प्रथम सुनावणी होणार हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील दुसऱ्या एका वादात दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना न्यायालयावर आपला विश्वास असून सर्वोच्च न्यायालयातही आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!