Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : हॉटेल ताज मध्ये घुमल्या ‘भाजपा-सेना युतीचा विजय असो’ च्या घोषणा…

Spread the love

मुंबई : ‘भाजपा-सेना युतीचा विजय असो’ च्या घोषणांमध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि भाजपचे आमदार यांची एकत्रित बैठक  हॉटेल ताजमध्ये पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांचे  स्वागत केले.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि , “आपण आता पुन्हा एकत्र आलो आहोत. आपल्यासोबत आलेले हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे”,  विशेष म्हणजे या बैठकीत उद्या होणाऱ्या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसदंर्भात रणनीती आखण्यात आल्याचे वृत्त आहे.

भाजप सेने पुन्हा एकत्र …

दरम्यान , भाजपा-सेना वेगळी होती, असे इतके वर्ष कधी वाटले नाही. दरम्यानच्या काळात थोडे दूर गेल्यासारखे झाले. पण आता पुन्हा एकत्र आलो आहोत. मूळ परिवार एक झाला आहे. आपल्यासोबत आलेले हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे. आता एकत्र वाटचाल आपल्याला करायची आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव आपल्याला सर्वांना मिळून प्राप्त करून द्यायचे आहे”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

बाळासाहेबांनी पाहिलेले स्वपन पूर्ण झाले : एकनाथ शिंदे

यावेळी बोलताना मुख्यमंत्री आणि बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे म्हणाले कि , आज खऱ्या अर्थाने भाजपा-सेना युतीचे सरकार आले, याचे चित्र डोळ्यापुढे आहे. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण झाले आहे. दरम्यानच्या सरकारच्या काळात वीर सावरकर यांचा अपमान, दाऊद संबंधाचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव, हे सारे अस्वस्थेचे विषय बनत चालले होते. शिवसेनेचे अधिक नुकसान होतेय हे पाहणे त्रासदायक होते.

नेतृत्वाला सांगण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही …

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले कि, नेतृत्वाला सांगण्याचे प्रयत्न खूप झाले, पण दुर्देवाने त्यात यश आले नाही. म्हणून आजची स्थिती निर्माण झाली. आपण मतदारांना न्याय देऊ शकलो नाही. तर आपल्या आमदारकीचा उपयोग काय? हाच सर्वांचा विचार होता. येत्या वर्षभरात अडीच वर्षाच्या कामाचा अनुशेष भरून काढू, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेतच. त्यांना कामाचा अनुभव प्रचंड आहे. कठीण कामे सोपी कशी करायची हे त्यांना ठावूक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. त्यांचा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सुद्धा मी आभारी आहे.

हॉटेल ताजमध्ये जाण्यापूर्वी शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे शिष्ठमंडळ मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , गिरीश महाजन , आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. त्यांना घेऊन जाण्यासाठी  विमानतळाबाहेर पाच बस उभ्या होत्या. या सर्व बसमध्ये भाजपचे आमदार होते. शिंदे गटाच्या आमदारांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर या पाचही बस ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्या. हॉटेल ताजमधील बैठकीला १६८ आमदार उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!