UttarPradeshNewsUpdate : आणखी एक वाद , शुक्रवारच्या नमाजवर बंदीची मागणी , पूजा पांडेवर गुन्हा दाखल

अलिगढ : भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांचे प्रकरण देश विदेशात गाजत असतानाच हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे यांनी अलिगढमध्ये शुक्रवारच्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी करून योगी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. दरम्यान सावध पावले उचलत पोलिसांनी पूजा पांडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या पूजा पांडे त्याच आहेत ज्यांनी २०१९ मध्ये गोडसेचा गौरव करीत महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घातल्या होत्या.
दरम्यान पोलिसांच्या या कारवाईबरोबरच अतिरिक्त नगर दंडाधिकाऱ्यांनी पूजा पांडेविरुद्ध नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देताना, खरे बोलून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व असल्याचे पूजा पांडे यांनी सांगितले. पूजावर जातीयवादी वक्तव्ये करणे आणि वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अलिगढ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पांडेने हे वादग्रस्त विधान सोशल मीडियावर शेअर केले आहे.
पूजा पांडे यांनी निवेदनाद्वारे शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर गांधी पार्क पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, निवेदन सादर करण्यापूर्वी तुम्ही माध्यमांसमोर केलेली विधाने प्रथमदर्शनी, धार्मिक उन्माद पसरवण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. ही व्हिडिओ क्लिप तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केली होती, ज्यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत.
जिल्ह्यात कलम 144 लागू असून, त्यात नियमाविरुद्ध गर्दी जमवणे, परवानगीशिवाय कार्यक्रम करणे आणि कोणत्याही धार्मिक समुदायाच्या भावना भडकावणारी वक्तव्ये करणे याला मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही आपण केवळ मीडियामध्ये आक्षेपार्ह विधाने केली नाही तर ही व्हिडीओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली, त्यामुळे संवेदनशील शहरात शांतता बिघडण्याची आणि विविध समुदायांमधील वाद आणि जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. अलीगढ प्रमाणे.