Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Rajysabha Election 2022 : मुख्यमंत्र्यांची भेट टाळून संभाजीराजे कोल्हापूरकडे , शिवसेनेची बैठक सुरु

Spread the love

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने दिलेली ऑफर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भेटीचे निमंत्रण नाकारून छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरकडे रवाना झाले असून पुढची रणनिती आखण्यासाठी शिवसेना भावनावर मराठवाड्यातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्यसभेतील सहाव्या जागेचा तिढा, मुख्यमंत्र्यांची मराठवाड्यातील सभा आणि औरंगाबादेतील पाणी प्रश्न अशा महत्त्वाच्या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 


दरम्यान आज दुपारी १२ वाजता वर्षावर येऊन शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करु, अशी ऑफर शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना दिली होती. मात्र सेनेची ऑफर नाकारून  संभाजीराजेंनी सकाळीच मुंबईहून कोल्हापूरकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. मात्र त्यांनी यासंदर्भातील कोणताही निरोप शिवसेनेला कळविला नाही. मराठा क्रांती मोर्च्याच्या नेत्यांशी चर्चा करून ते आपली अंतिम भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेना भवनातील बैठकीला चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर आणि जयदत्त क्षीरसागर हे उपस्थित आहेत. संभाजीराजेंनी जर शिवसेनेच्या ऑफरला स्पष्ट शब्दात नकार दिला तर शिवसेना पक्ष ग्रामीण भागातील कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी देईल, अशी भूमिका समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राज्यसभेसाठीच्या शर्यतीतलं ते नाव कोणतं? राज्यसभेची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकते?, अशा नावांवर आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

शिवसेनेच्या  काही आमदारांची भूमिका

दरम्यान शिवसेना राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना दोन उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेनेच्या गोटातील काही आमदारांनी  संभाजीराजे यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशी कुजबुज सुरु केली असली तरी शिवसेना पक्ष प्रमुख आपला आदेश दिल्यानंतर या कुजबुजीला कोणताही अर्थ राहणार नाही हे उघड आहे.

राजेश टोपेंची प्रतिक्रिया

दरम्यान या बाबत आपली प्रतिक्रिया देताना  आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. संभाजीराजेंबद्दल आम्हाला सर्वांना आदर आहे. पूर्वी ते राष्ट्रवादी पक्षाचे जवळचे सहकारी होते. आम्ही त्यांना लोकसभेची उमेदवारीदेखील दिली आहे. शरद पवारांशी, आमच्याशी सर्वांशी त्यांचे संबंध प्रेमाचे, आपुलकीचे आहेत. पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडी यासंदर्भातील स्पष्ट निर्णय घेतील”

संभाजी राजे यांची मोठी अडचण

अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेची निवडणूक लढविताना संभाजी राजे यांची मोठी अडचण झाली आहे . महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते लढण्यास तयार नसतील तर महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाही कारण हि जागा शिवसेनेने आपल्याकडे घेतली आहे कारण त्यांच्याकडे अतिरिक्त मतांची संख्या अधिक आहे. काँग्रेसकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी शिवसेनेची पर्यायाने महाविकास आघाडीची जी भूमिका असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटल्यामुळे संभाजी राजे यांना किती आमदारांचा पाठिंबा असेल हे सांगणे अवघड आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपचा पुन्हा पाठिंबा घ्यावयाचा झाल्यास भाजपाकडे केवळ २२ अतिरिक्त मते असल्याने त्यांना आणखी २० मते मिळवावी  अवघड आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!