Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : बुद्धाच्या मार्गानेच विषमता दूर होईल आणि समानता येईल : मुख्यमंत्री

Spread the love

मुंबई : समाजातील हिंसाचार, विकृती, युद्धजन्य स्थिती, विषमता संपविण्यासाठी गौतम बुद्धाचा शांती, अहिंसा, बंधुता व समतेचा विचार अंगीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आजच्या अनेक सामाजिक समस्यांतून बाहेर यायचे असेल तर गौतम बुद्धांची विचारसरणी मार्गदर्शक आहे.


आपल्यातील भेदाभेद, विषमता नष्ट करणारा समतेचा त्यांचा उपदेश आपण स्वीकारून वाटचाल केली तर तीच खरी मानवता येईल. आज समाजात हिंसाचार, विकृती, युद्धजन्य स्थिती वाढली आहे. या विकारांवर गौतम बुद्धांचा क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश आपणा सर्वाना मार्ग दाखवणार आहे, तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतिसूत्रे अंगीकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंधकार दूर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

तथागत बुद्धांनी दिलेली अहिंसा, शांती व करुणेची शिकवण जनसामान्यांना तसेच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे.

बुद्धांचे विचार प्रेरणादायी : अजित पवार

समाजात एकता, समता, बंधुता, विश्वशांतीचे, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याची ताकद तथागत गौतम बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण निर्माण करण्यासाठी गौतम बुद्धांचे विचार प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. गौतम बुद्धांची व्यापक समाजहिताची शिकवण दु:खांवर मात करण्याची, संकटातून मार्ग काढण्याची ताकद सदैव देत राहील, असेही त्यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!