Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेबाबत मोठी बातमी …

Spread the love

जगदीश कस्तुरे । औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादेत सभा आयोजीत करण्यात आली आहे. मात्र, या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे. अद्याप या सभेच्या परवानगीबाबत पोलिसांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी पोलिसांना इशारा दिला आहे की,. पोलिसांनी परवानगीबाबत लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही पुढच्या आठवड्यात कोर्टात दाद मागू अशी माहिती प्रकाश महाजन यांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे , नाशिक आणि पुणे शहराच्या नंतर औरंगाबाद हे अत्यंत संवेदनशील शहर असल्यामुळे  आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणामुळे  या शहरात राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी द्यावी कि नाही याबाबतीत पोलीस प्रशासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते चिंतीत झाले आहेत. अर्थात स्वतःच्या पातळीवर याबाबतीत निर्णय घेण्यापेक्षा राज्याच्या गृहविभागाकडून योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंरच पोलीस आयुक्त आदेश देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सभेच्या परवानगीसाठी कोर्टात जाण्याचा इशारा

दरम्यान, राज ठाकरे यांच्या 1 मे च्या सभेला परवानगीसाठी अर्ज करुन आज चार दिवस उलटले आहेत. मात्र, पोलिसांनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी राज ठाकरे यांच्या परवानगीबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेबाबत परवानगीचा योग्य तो निर्णय घ्या अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा महाजन यांनी दिला आहे. या प्रकरणी औरंगाबादचे अप्पर पोलिस महासंचालक डाॅ.निखील गुप्ता यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
त्यामुळे आता पोलीस प्रशासन आता याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान महाजन बोलतांना पुढे म्हणाले की, पोलिसांविरुध्द न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर व स्वता:राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत त्यानुसार पाऊले उचलली जातील.

पोलीस आयुक्तांचे ” नो कॉमेंट”

याबाबतीत ‘महानायक’च्या वतीने पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आयुक्तांनी ” नो कॉमेंट ” अशी प्रतिक्रिया देऊन या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला. या आधी पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या हिजाब गर्ल मुस्कानच्या सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारली होती त्यावेळीही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते त्याचीच पुनरावृत्ती या निमित्ताने होताना दिसत आहे.

विविध संघटनांचा विरोध

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेतून 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमच दिला आहे. 3 मे पर्यंत जर भोंग्यांच्या संदर्भात निर्णय झाला नाही तर जशास तसे उत्तर देण्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. पण या सभेला आता मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीसाठी पोलिसांकडे परवानगी सुद्धा मागितली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष अशा विविध संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!