MaharashtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : एमआयएमच्या ऑफर नंतर सेना नेत्यांनी हे फोटो केले व्हायरल …

औरंगाबाद : एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी झालेल्या चर्चेत एमआयएम भाजपला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार असल्याची चर्चा करताच शिवसेना नेत्यांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. यावर आ. अंबादास दानवे यांनी भाजपनेते देवेंद्र फडणवीस आणि खा. इम्तियाज जलील यांचा चहा घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे . या पोस्टमध्ये त्यांनी त्यांनी एमआयएम ची युतीची ऑफर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच आल्याचे म्हटले आहे. तर हाच मुद्दा स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , खा. संजय राऊत , शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही प्रखरपणे मंडल असून हे देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र असल्याची टीका केली आहे.
आ. अंबादास दानवे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार इम्तियाज जलील यांचा पुढील फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. यामध्ये “जलील फडणवीसांना म्हणत आहे की, मी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो. त्यावर फडणवीस म्हणत आहेत की, मग मी लगेच ठाकरेंच्या नावाने बोंब मारत हिंदुत्वाच्या गप्पा मारतो,” असे बोलत असल्याचे म्हटले आहे.
“एमआयएम ही संघटना जातीवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीची आहे. भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी आम्ही कसे जोडले जाणार? औरंगजेबासमोर हे लोक गुडघे टेकतात. अशा संघटनेशी शिवसेना कधीही जोडली जाणार नाही. भगव्याला विरोध करणारी संघटना आहे. या विचारांशी शिवसेना कधीही तडजोड करू शकत नाही आणि या प्रस्तावाचे शिवसेनेला कोणतेही देणेघेणे नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले होते.
चंद्रकांत खैरे
तर फडणवीसांचाच हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपाची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
संजय राऊत – जयंत पाटील
दरम्यान,औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्या एमआयएमबरोबर उघड वा छुपी आघाडी होऊच शकत नाही. ज्यांच्याबरोबर छुपी हातमिळवणी आहे त्यांना लखलाभ ठरो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. एमआयएम हा समविचारी पक्ष आहे हे या पक्षाने आधी सिद्ध करावे. उलट हा पक्ष कोणाचा ब संघ आहे हे लोकांना चांगलेच कळले असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेले आहे असे म्हणत शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
जनाब @Dev_Fadnavis जी, तेव्हा तुम्ही #जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, 105 आमदार निवडूनही @BJP4Maharashtra सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?@ShivsenaComms #BJP pic.twitter.com/tn0j6rWZwp
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) March 20, 2022
यावरुन शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली असून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्वीट करत ” आताच जनाब या शब्दाबद्दल एवढा राग? का असा सवाल केला आहे. “आम्ही पाहतो आहोत की सत्तेसाठी ते आणखी काय करतात? तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे आणि अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का पाहूयात,” असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.
“जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, १०५ आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?,” अशी टीका मनिषा कायंदे यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.