Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaBudget 2022Update : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ , आज संसदेत काय झाले ?

Spread the love

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेला मार्गदर्शन केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. आर्थिक सर्वेक्षणात, भारतीय अर्थव्यवस्था २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे. देशाचा आर्थिक सर्वेक्षण आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे.


दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी ११ वाजता संसदेत देशाचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या  अर्थसंकल्पात अर्थमंत्री आगामी आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी देशाचे उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा मांडणार असून त्यानंतर  केंद्रीय मंत्रिमंडळ संसदेच्या कामकाजापूर्वी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देईल. त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्प पेपरलेस असेल. कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 टप्प्यात विभागण्यात आले आहे. पहिला टप्पा 31 जानेवारी, दुसरा टप्पा 11 फेब्रुवारी आणि तिसरा टप्पा 14 मार्चपासून सुरू होईल. हे अधिवेशन 8 एप्रिल रोजी संपणार आहे.

राष्ट्रपतींकडून सरकारचा गौरव

संसदेच्या दोन्हीही  सभागृहांना संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  आपल्या अभिभाषणात केंद्र सरकारचा गौरव केला ते म्हणाले कि ,  “कोरोना महामारीचे हे तिसरे वर्ष असून या काळात भारतातील लोकांचा लोकशाही मूल्यांवरील विश्वास, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा अधिक वाढल्याचे आपण पाहिले आहे. भारतात बनवल्या जाणाऱ्या कोरोनाच्या लसी संपूर्ण जगाला महामारीपासून मुक्त करण्यात आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आज देशातील 90 टक्क्यांहून अधिक जेष्ठ नागरिकांना लसीचा एक डोस मिळाला आहे, तर 70 टक्क्यांहून अधिक लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. सरकारने 64 हजार कोटी रुपये खर्च करून सुरू केलेले पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य अभियान हे एक कौतुक करण्यासारखे उदाहरण आहे. ही योजना केवळ सध्याच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करेल असे नाही तर आगामी संकटावेळीही खूप मदत करेल.”

“देशात आज 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना लसीचा एक डोस पूर्ण झाला आहे तर 70 टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. लसीकरणात देश जगात अव्वल आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हा सरकारचा मंत्र असून सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्राचं महत्वाचं योगदान आहे, असे मत रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

असे आहे आज आणि उद्याचे कामकाज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालेल. उद्या  १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात त्यांनी पुढील आर्थिक 2022-23 वर्षात भारताचा विकास दर (GDP) 8 ते 8.50 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेत मुख्य भूमिका असणाऱ्या कृषी क्षेत्रात 3.9 टक्के, तर उद्योग क्षेत्रात 11.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

कर्ज महाग होणार नाही

चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ 3.9 टक्के राहील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. या आर्थिक वर्षात औद्योगिक वाढ 11.8 टक्के राहील. या आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत 89,000 कोटी रुपयांहून अधिक IPO द्वारे उभारण्यात आल्याचेही यात म्हटले आहे. या सर्वेक्षणात महागाईचा दर आटोक्यात राहणे अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बाब आहे. महागाई आटोक्यात राहिल्यास रिझर्व्ह बँकेवर रेपो वाढवण्याचा फारसा दबाव राहणार नाही. त्यामुळे कर्ज महाग होणार नाही.

या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेचे सर्व इंडिकेटर्स हे दर्शवत आहेत की आव्हानांना तोंड देण्यासाठी आपली अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. त्याला कृषी आणि औद्योगिक वाढीचा पाठिंबा मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात जुलै-सप्टेंबर या कालावधीत अर्थव्यवस्थेचा वेग वाढला आहे. यासह, ते कोरोनाच्या आधीच्या पातळीवर येण्यात यशस्वी झाले आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. कच्चे तेल महाग झाल्यावर आमच्यासाठी अडचणी वाढतात. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल 90 डॉलरच्या जवळ पोहोचला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 70-75 डॉलर असा अंदाज आहे.

शेअर बाजारात कमालीची वाढ

आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजारात कमालीची वाढ झाली आहे. सेन्सेक्स 1000 अंकांच्या वर गेला आहे. सकाळी शेअर बाजार तेजीत उघडला होता. आर्थिक सर्वेक्षणात वाढीच्या उच्च अंदाजामुळे बाजार पॉझिटिव्ह दिसत आहे. याचे कारण उच्च वाढीमुळे मागणी वाढेल, ज्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या कामगिरीवर होईल.

पंप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले. त्यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मी माझ्या सर्व मित्रांचे स्वागत करतो. आजच्या जागतिक परिस्थितीत भारतासाठी अनेक संधी आहेत. असे सांगत खासदारांना सभागृहाच्या चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

‘निवडणुका होतील, पण सर्व सदस्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत खुल्या मनाने सहभागी व्हावे. या अधिवेशनात आपल्या संसद सदस्यांचे संभाषण, चर्चेचा मुद्दा हा जागतिक प्रभावाचा महत्त्वाचा मुद्दा बनू शकतो. सर्व खासदार मोकळ्या मनाने चर्चा करून देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी आशा आहे. मी सर्व आदरणीय खासदारांना प्रार्थना करेन की निवडणुका होतील, पण अर्थसंकल्पीय अधिवेशन वर्षभराची ब्लू प्रिंट काढते, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण पूर्ण बांधिलकीने जितके करू तितका देशाचा फायदा होईल. अशी भावना यावेळी मोदींनी व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!