Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात थंडीच्या लाटेबरोबर आणखी एका अस्मानी संकटाचा इशारा…

Spread the love

मुंबई : एका बाजूला देशात थंडीची लाट आलेली असताना दुसऱ्या बाजूला गेल्या चोवीस तासांत उत्तर आणि लगतच्या मध्य व पश्चिम अरबी समुद्रात धुळीचे वादळी वारे वाहत आहेत. येत्या १२ तासांत उत्तर कोकणात धुळीचे हे वादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यावरून मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


यामध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या बारा तासांत याठिकाणी धुळीचे वारे वाहणार आहेत. हे वारे २० ते ३० किमी प्रतितास वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान या संकटाबरोबरच दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. येत्या काही तासात याठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर उद्यापासून राज्यात कोरडं हवामान राहणार असून पुढील चार दिवसांसाठी कोणताही इशारा देण्यात आला नाही.

दुसरीकडे, राज्यात गेल्या चोवीस तासात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाल्याने किमान तापमानात किंचितशी वाढ झाली आहे. तसेच वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्यानं मुंबईत लोकल ट्रेन, आणि उंच इमारती काहीशा अंधुक दिसत असल्याचेही फोटो समोर आले आहेत. तसंच मुंबईत आज सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीतर यांनी ट्विटरवरून दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!