Congress News Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील महापालिका , नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: याबाबत तसे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस स्थानिक पातळीवर कोणतीही तडजोड न करता या निवडणुका स्वबळावर लढणार असून काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्या पत्रात काँग्रेसची ही भूमिका नमूद करण्यात आली आहे.
सरचिटणीस देवानंद पवार यांनी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि , आगामी काळात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणुका होणार आहेत. येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींच्या दृष्टीकोनाने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्षाने कुठलीही तडजोड न करता स्वबळावर लढविण्याच्यादृष्टीने आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन आढावा घ्यावा. तसेच यासंदर्भात नियोजन करुन आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांपुढे सादर करावा. तसेच आपल्या जिल्ह्यातील गठीत केलेल्या बुथ कमिट्यांची संपूर्ण तपशिलवार अद्यावत माहिती प्रदेशाध्यकांपुढे सादर करावी.
दरम्यान राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसने आपल्या पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचे पत्र दिल्यामुळे त्यांचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि सेना याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.