IndiaNewsUpdate : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी प्रकरणी पवारांचा मोदी आणि योगी सरकारवर निशाणा

मुंबई : उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खेरी येथील आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलांने गाडी घातल्याच्या प्रकरणावरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौन धारण करण्याच्या प्रवृत्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यूपीतील घटनेवर भाष्य केले आहे. दरम्यान या परिस्थितीची तुलना जालियनवाला बागेतील हत्याकांडाच्या परिस्थितीशी करतानाच, यूपीमध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला करण्यात आला, त्यातून भाजपची नियत दिसली आहे,’ अशी जळजळीत टीकात्यांनी यावेळी केली.
शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उत्तर प्रदेशातील संपूर्ण घटनाक्रमावर तीव्र चिंता व्यक्त केली. ‘लखीमपूर खेरी येथे शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत होते. सरकारकडे आपले गाऱ्हाणे मांडण्याचा हक्क बजावत होते. त्यांच्यावर सत्ताधारी भाजपशी संबंधित लोकांनी गाडी घालून त्यांना चिरडले. हा सरळसरळ शेतकऱ्यांवरचा हल्ला आहे. उत्तर प्रदेश व केंद्र सरकारने याची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे,’ असेही शरद पवार यांनी सुनावले.
पवार पुढे म्हणाले कि , लखीमपूर येथील घटनेचा केवळ निषेध करून समाधान होणार नाही. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची गरज आहे. उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी घोषणा केली आहे. मात्र, आम्हाला ते मंजूर नाही. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणीकरून ते म्हणाले कि , उत्तर प्रदेशात इतका हिंसाचार होऊनही पंतप्रधान मोदी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला झाला, त्यावरून केंद्र सरकारची नियत दिसली आहे. आज तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून सत्तेचा गैरवापर करून तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. पण त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही एक दोन दिवस असे करू शकाल. पण फार काळ हे चालणार नाही. ह्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी तुम्हाला देईल.’