Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अभिमानस्पद : महाराष्ट्राचे सुपुत्र विवेक राम चौधरी यांनी स्वीकारली भारतीय हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र मिग-२९ या लढाऊ विमानाचे पायलट एअर चिफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी आज मावळते हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांच्याकडून भारतीय हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. विवेक चौधरी हे हवाई दलाचे २७ वे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे विवेक चौधरी हे मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. त्यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि वायू सेना पदक मिळाले आहे.

हवाई दल प्रमुख झालेल्या विवेक आर. चौधरी यांनी यापूर्वी हवाई दल अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. विवेक चौधरी हे १९८२ मध्ये हवाई दलात दाखल झाले. मिग-२९ या लढाऊ विमानाचे ते पायलट आहेत. आपल्या आतापर्यंतच्या ३९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक कमांड आणि स्टाफच्या नेमणुका केल्या आहेत. ते हवाई दलाचे प्रमुख होण्याआधी ते उपप्रमुख (व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ ) होते.

गेल्या वर्षी पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसी वर चीनशी वाद झाला होता, तेव्हा ते हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे कमांडिंग-इन-चीफ होते. त्यांच्या देखरेखीखाली हवाई दलाने पूर्व लडाखमध्ये आपले ऑपरेशन केले होते. आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेची कोणत्याही स्थितीत सुरक्षा केली पाहिजे, असा संदेश चौधरी यांनी गुरुवारी हवाईदल प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हवाई दलाच्या सर्व जवांना दिला आहे.

कोण आहेत हवाई दल प्रमुख विवेक चौधरी ?

विवेक राम चौधरी हे २९ डिसेंबर १९८२ मध्ये हवाई दलात रुजू झाले. ते नॅशनल डिफेन्स अकादमीचे (NDA) विद्यार्थी आहेत. मिग आणि सुखोई ही लढाऊ विमाने उडवण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड जिल्ह्यात झाले असून विवेक चौधरी यांचे कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हस्तरा या गावचे आहे. दरम्यान नांदेडचा सुपुत्र हवाई दल प्रमुख झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. विवेक चौधरी यांचे कुटुंब हे मूळचे शेतकरी असून हस्तरा येथे विवेक चौधरी यांची शेती आणि घर आहे. विवेक चौधरी यांचे वडील रामभाऊ गणपत चौधरी हे अभियंता होते तर आई मुख्याध्यापिका होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!