Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : पंजाबचे राजकारण , सिद्धूच्या कुरापती आणि काँग्रेस हायकमांडची तंबी !!

Spread the love

नवी दिल्ली : पंजाबच्या राजकारणावरून काँग्रेस अंतर्गत सुरु असलेले वादळ अद्याप शांत झालेले नाही. दरम्यान नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा मंगळवारी दिलेला राजीनामा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अद्याप स्वीकारला नसून  आपसात चर्चा करून  हा वाद मिटवण्याची सूचना मुख्यमंत्री आणि सिद्धू यांना केली आहे. या सर्व प्रकरणामुळे आता काँग्रेस हायकमांडने सिद्धूच्या वर्तनावर  तीव्र नाराजी व्यक्त केली असून या सूचनेनंतरही सिद्धू  आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर पक्ष नवीन प्रदेशाध्यक्ष निवडेल, असे  संकेतवजा तंबीच जणू  काँग्रेस हायकमांडने दिली आहे. 

दरम्यान नवज्योत सिंग सिद्धूंवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस हायकमांडने पर्यायी नव्या प्रदेशाध्यांच्या नावावर विचारही सुरू केला असल्याचेही  वृत्त आहे. सिद्धूंना राजीनामा परत घेण्याचे  संकेत देण्यात आले असून याबाबत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह पंजाबमधील काँग्रेस नेते सिद्धूंचे  मन वळण्यासाठी चर्चा करतील. पण त्यानंतरही सिद्धूंनी ऐकले  नाही तर मग काँग्रेस हायकमांडकडून त्यांचा राजीनामा मंजूर केला जाईल आणि नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्त केला जाईल, असा स्पष्ट संदेश काँग्रेस हायकमांडने दिला आहे.

सिद्धूमुळेच काँग्रेसने बदलले मुख्यमंत्री !!

नवज्योत सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा आणि त्यांच्या वर्तनाने काँग्रेस हायकमांडला धक्का बसला आहे. थेट हायकमांडशी संवाद साधण्याचा मार्ग असतानाही राजीनामा देण्यापूर्वी सिद्धू यांनी पक्ष नेतृत्वाशी कुठलाही चर्चा केली नाही, असे  पक्षातील सूत्रांनी सांगितलं. सिद्धूंच्या या पावलामुळे पंजाब काँग्रेसमधील कलह पुन्हा नाजूक वळणावर पोहोचला आहे. तसेच सिद्धूंच्या दबावात अमरिंदर सिंग यांचा बळी घेतल्याने काँग्रेस नेतृत्वावर वरिष्ठ नेत्यांकडून टीका होत आहे. आता मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केले हेच अमरिंदर सिंग भाजपच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नांत असल्याचे चित्र आज दिसले. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाचे अंदाज बांधले जात आहेत.

सिद्धूंच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थनात कायम पुढे असणाऱ्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रांनाही धक्का बसला आहे. दरम्यान सिद्धूंची समजूत घालण्यासाठी निघालेल्या पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनाही  काँग्रेस हायकमांडने रोखले  आहे. यासोबतच नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावांवर विचारही सुरू केला आहे, असे  सूत्रांनी सांगितले. पक्ष हा व्यक्तीपेक्षा मोठा असतो, असा संदेश मुख्यमंत्री चन्नी यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून काँग्रेस हायकमांडने सिद्धूंना दिला आहे.
छोटे-छोटे वाद आणि मतभेद दूर करण्यासाठी सिद्धूंनी पुढाकार घ्यावा. अन्यथा आगामी विधानसभा निवडणूक पाहता लवकरात लवकर नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीचा निर्णय घेतला जाईल असा दबाव सिद्धूवर आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!