Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoliticalNewsUpdate : उत्तर प्रदेशात काँग्रेसचं असं चाललंय … प्रियंका गांधी यांच्या हातात आहे कमांड ..

Spread the love

लखनौ : पुढच्या वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लखनौमध्ये बैठकांचे सत्र सुरु केले आहे. या निवडणुकीत किमान १०० जागा काबीज करण्याची रणनीती आखली जात असून पक्षीय पातळीवर अनेक फेरबदल केले जात असल्याचे वृत्त आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय सिंह लल्लू यांच्यावर उत्तर प्रदेशातील नेत्यांची नाराजी असल्याने पक्षातील गटबाजी टाळण्यावर प्रियांका गांधी यांचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाय जातीय समीकरणे जुळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे . उत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागा असल्या तरी पक्ष केवळ १०० जागांवर विजय मिळेल यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. जेणेकरुन इतर पक्षांसोबत काँग्रेसची युती होऊ शकेल. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त ७ जागांवर समाधान मानावे लागले होते. १०० जागा आपल्याकडे घेऊन उर्वरित जागांवर काँग्रेससोबत युती करणाऱ्या पक्षांचा विचार पक्षाकडून केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशची सर्व जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपवण्यात आल्याने त्या स्वतः या निवडणुकीची तयारी करीत आहेत. दरम्यान १०० जागांवर निवडून येतील अशा उमेदवारांचा शोध घेतला जात असून उमेदवारी तिकीटासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जासाठी ११ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शिवसेना १०० जागा लढवणार

दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कालपर्यंत शिवसेना सर्व ४०३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु २४ तासांत पुन्हा ४०३ वरुन खाली येत १०० जागा लढवण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ४०३ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी केवळ १०० जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले. २०१७ मध्ये  झालेल्या  उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही   शिवसेनेने ५७ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी एक जागा वगळता ५६ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!