Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : एमपीएससी होऊनही अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होत नसल्याने “त्याने ” उचलले टोकाचे पाऊल !!

Spread the love

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने , पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय युवकाने नैराश्यातून  गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये स्वप्निलने, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका असे त्यामध्ये त्याने म्हटले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल सुनील लोणकर रा. फुरसुंगी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निलच्या वडिलांची शनिवार पेठेत प्रिंटींग प्रेस आहे. स्वप्निलचे आई वडिल  बुधवारी नेहमीप्रमाणे प्रेसमध्ये गेले होते. तर स्वप्निलची बहिण बाहेर गेली होती. दुपारच्या सुमारास घरी आल्यानंतर, स्वप्निल कुठेच दिसत नसल्याचे पाहून त्याच्या बहिणीने त्याच्या खोलीत जाऊन पाहिले. स्वप्निलने तेथे गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तत्काळ आई वडिलांना दिली. त्यानंतर जवळील रूग्णालयात स्वप्निला उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

स्वप्नील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करत होता. तो २०१९ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या पूर्व व मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला होता. मात्र कोरोनाकाळातील निर्बंधामुळे त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही पू्र्व परीक्षा दिली. त्यामध्येही तो उत्तीर्ण झाला. विविध जिल्ह्यातील निर्बंधामुळे मुख्य परीक्षा झालेली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात स्वप्निलने म्हटले आहे.

स्वप्निलचं पत्र…

” MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता!

नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!