Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अनाथ बालकांचे राज्य घेणार पालकत्व , 10 कोटी रुपयांची तरतूद

Spread the love

मुंबई : कोविड -19 मुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काही बालकांच्या आई आणि वडील अशा दोनही पालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अनाथ झालेल्या बालकांना दिलासा देण्याविषयी आम्ही विचार करत होतो. त्यानुसार अशा बालकांचे पालकत्व स्वीकारण्यास राज्य शासन खंबीर असून प्रतिबालक 5 लाख रुपये त्यांच्या नावे मुदत ठेव ठेवण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.‍ त्याशिवाय अन्य योजनांचा लाभ देऊन बालकांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले.

ॲड. ठाकूर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कोविडच्या संसर्गाने अचानक दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. अशा बालकांना मायेचा अधार देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शून्य ते अठरा वयोगटातील बालकांसाठी नवीन योजना महिला व बालविकास विभागामार्फत आणण्याबाबत विचार केला जात होता. केंद्र शासनाचे अर्थसहाय्य मिळेल तेव्हा मिळेल. परंतु, राज्य शासन म्हणून आम्ही आमची जबाबदारी गांभीर्याने पूर्ण करणार आहोत. त्यासाठीच अशा बालकांच्या नावे 5 लाख रुपये मुदत ठेव ठेऊन त्या रकमेचा उपयोग भविष्यात त्यांच्या पुनर्वसनासाठी करण्यात येणार आहे. दरम्यान या बालकांचे संगोपन करण्यास कोणी नातेवाईक पुढे न आल्यास शासनाच्या बालसंगोपन गृहात दाखल करण्यात येईल.

कोविड-19 च्या संसर्गामुळे पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी घेण्यास कोणी नातेवाईक व कुटुंबातील अन्य सदस्य तयार असल्यास अशा बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला जाईल. बालसंगोपन योजनेच्या अनुदानात प्रतिबालक 1100 रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आम्ही नुकताच घेतलेला आहे. त्यामुळे या अनाथ बालकांच्या नातेवाईकांनीही बालकांवर मायेचा हात राहील यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करते असे मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या.

या अनाथ बालकांच्या मानसिक पुनर्वसनासोबतच त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे उपजीविकेचे कायमस्वरुपी पुनर्वसन होईल यादृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात जिल्हास्तरीय टास्क फोर्स नेमून आम्ही राज्यातील अनाथ बालकांचा शोध घेतला. या दरम्यान कोरोनामुळे अनाथ झालेल्या 141 बालकांचा शोध आम्हाला लागता. तथापि, अद्याप काही ठिकाणी माहिती मिळाली नसणे शक्य आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढू शकते. तूर्तास अंदाजे 200 बालके अनाथ झाल्याचे गृहित धरुन प्रत्येकी 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवणे यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद आज करण्यात आली आहे. आणखी बालके अनाथ झाल्याचे आढळून आल्यास अतिरिक्त तरतूद करण्यात येईल, असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या.

 

 

 

या योजनेचा लाभ 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके ज्यांचे दोन्ही पालक दि. 1 मार्च, 2020 किंवा त्यानंतर कोविड-19 च्या संसर्गामुळे निधन झाल्यामुळे अनाथ झाली आहेत अशी बालके; या कालावधीत कोविड संसर्गामुळे एका पालकाचा आणि इतर कारणाने दुसऱ्या पालकाचा मृत्यू झाला आहे अशी बालके; तसेच दि. 1 मार्च, 2020 पूर्वी कोणत्याही कारणाने एका पालकाचा आणि त्यानंतर कोविड संसर्गाने एका पालकाचा मृत्यू झाला आहे अशा बालकांना लाभ मिळणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!