Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पदमश्री फातेमा रफिक झकेरिया यांचे निधन

Spread the love

औरंगाबाद: मौलाना आझाद शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा तसेच पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या फातेमा रफिक झकेरिया  यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी मंगळवारी (६ एप्रिल) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी उपचारासाठी बजाज हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते.

फातेमा झकेरिया यांनी ५० वर्षांहून अधिक काळ विविध क्षेत्रांमध्ये आपले महत्वाचे योगदान दिले आहे. त्या मुंबई टाइम्सच्या माजी संपादिका होत्या. तसेच टाइम्स ऑफ इंडियाच्या संडे एडिटर आणि ताज मॅगझिनच्या संपादिका होत्या. झकेरिया यांनी पत्रकारितेबरोबरच शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्यात महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.

१७ फेब्रुवारी १९३६ रोजी मुंबईत जन्मलेल्या फातेमा झकेरिया यांनी मुंबईतील प्रसिद्ध इन्स्टीट्यूट ऑफ सोशल वर्कमधून शिक्षण घेतले होते. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करत त्यांनी सन १९५८ मध्ये त्यांनी इन्स्टीट्यूट ऑफ चिल्ड्रेन अॅण्ड विमेन या संस्थेद्वारे मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी ५०० हून अधिक मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्याची काळजी वाहिली. या बरोबरच त्यांनी ‘द इलस्ट्रेटेड’ या साप्ताहिकातून लहान मुलांसाठी लेखन देखील केले आहे.

फातेमा झकेरिया यांनी सन १९७०  ते १९८० च्या दशकात ‘द विकली’ या नावाजलेल्या साप्ताहिकात महत्वाच्या विविध पदांवर काम केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया, द विकली अशा वर्तमानपत्रे आणि साप्ताहिकांमध्ये विविध विषयांवर लिखाण देखील केले आहे. त्या काळात त्यांनी इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, जयप्रकाश नारायण, जेआरडी टाटा, पंतप्रधान मोरारजी देसाई, चरण सिंग अशा मोठ्या नेत्यांच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत.

फातेमा झकेरिया या उत्तम भाषांतरकार देखील होत्या. त्यांनी डॉ. जाकिर हुसैन, कृष्ण चंदर अशा विख्यात लेखकांच्या लघुकथांचे उर्दूतून इंग्रजीत भाषांतरही केले आहे. केंद्र सरकारने मीडियाची पुनर्रचना करण्याबाबत गठित केलेल्या समितीच्या झकेरिया या सदस्या देखील होत्या. त्याच्या योगदानाची दखल घेत त्यांना सन १९८३ मध्ये पत्रकारेता क्षेत्रातील सरोजिनी नायडू एकत्रिकरण पुरस्कार देखील देण्यात आला होता. फातेमा झकेरिया यांनी सन १९८४ मध्ये अमेरिकेतील निवडणुका, तसेच त्याच वर्षी लंडन येथील फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे वृत्तांकन देखील केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!