Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : आरोग्यसेवक पदाच्या परीक्षेतील गोंधळ प्रकरणी चौकशीचे आदेश , मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

Spread the love

मुंबई । औरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवक पदाच्या परीक्षेतील गोंधळाचे  पडसाद आज विधानपरिषेदतही  उमटले असून या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाच्या पेपर फुटीसंदर्भात पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनायक मेटे यांच्यासह डावखरे यांनीही परीक्षेतील घोळाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर, जर परीक्षेत गैरव्यवहार झाला असेल तर तत्काळ परीक्षा रद्द करण्यात येईल, कंपनी दोषी असल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासनही अजित पवार यांनी या प्रश्नाच्या उत्तरेत दिले.

दरम्यान या खळबळजनक प्रकरणात परीक्षार्थींना ज्या अभ्यासिकेतून उत्तरे सांगितली जात होती, त्या अभ्यासिकेच्या मालकाला पोलिसांनी आरोपी केले आहे. आपला या गुन्ह्याशी संबंध नसल्याचे दाखविण्यासाठी तो नाशिक येथे जावून तेथून सुत्रे हलवत होता. या रॅकेटने किती उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्याची हमी दिली होती, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ वाजता दोन सत्रांत आरोग्य विभागाची परीक्षा होती. या परीक्षेविषयी आरोग्य विभागाने बरीच गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न केला असला, तरीही या परीक्षेचा पेपर अखेर फुटलाच. औरंगाबाद तालुक्यातील गेवराई तांडा येथे धनेश्वरी कृषी महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रात एकाच्या नावावर दुसरा विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना दोन दिवस अगोदरच मिळाली होती. त्यानुसार चिकलठाणा पोलिसांचे पथक त्या विद्यार्थ्याला पकडण्याच्या तयारीत परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारात पाळत ठेवून होते. साध्या गणवेशात असलेल्या पोलिसांनी रविवारी सकाळी १० वाजता परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या मदन धरमसिंग बहुरे (२४, रा. जोडवाडी) या विद्यार्थ्यास महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातच पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कानात हेडफोन डिव्हाइस आढळून आले. त्यामुळे, राज्यभरात या परीक्षेच्या पेपर फुटीसंदर्भात चर्चा आणि तीव्र संताप घडला.

प्रति उमेदवार १० ते १५ लाख रुपयांची सुपारी

या प्रकरणातील आरोपींपैकी काहीजण स्पर्धा परीक्षेची तर काही पोलीस भरतीची तयारी करत आहेत. त्यांनी आरोग्यसेवक पदभरती जाहीर होण्याआधीपासून उमेदवारांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत १० ते १५ लाखांत नोकरीची हमी दिली होती. याकरिता त्यांनी मायक्रो डिव्हाईस इअर बड, एटीएम कार्डच्या आकाराचा मायक्रो मोबाईल ऑनलाईन खरेदी केला होता. कालच्या कारवाईत एक उमेदवार पोलिसांच्या हाती लागला तरी या रॅकेटने किती उमेदवार गळाला लावले होते आणि त्यांनी कितीजणाना असे साहित्य देऊन परीक्षा केंद्रात पाठवले होते, याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

५ आरोपींना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान सोमवारी दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. सी. कुंभारे आणि कर्मचाऱ्यांनी अटकेतील ५ आरोपींना न्यायालयात हजर केले. या आरोपींच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी कट रचून हा गुन्हा केला आहे, यामुळे त्यांना सात दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती फौजदार कुंभारे आणि सरकारी वकिलांनी केली. पोलिसांचे म्हणणे ग्राह्य धरुन न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!