Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#SanjayRathodResignation : मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजुर करा – संजय राठोड

Spread the love

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी राजीनामा दिला नाही तर, विधिमंडळ अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षाने दिला होता. त्यामुळे आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. ‘मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजुर करा.’ अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आता याबद्दल मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि म्हणाले की, “मी माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून विरोधी पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. माझी, माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकारणातून उठवण्याचाही प्रकारही झाला, “असे संजय राठोड म्हणाले. गेल्या तीस वर्षात सामाजिक, राजकीय क्षेत्रात मी जे काम केले, ते उद्ध्वस्त करण्याचे काम झाले आहे. मी आधीही हे बोललो. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, अशीच माझी मागणी आहे. मी बाजूला राहून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी भूमिका आहे. सत्य बाहेर यावे. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे. त्यामुळेच मी राजीनामा दिला आहे,” असे संजय राठोड यांनी स्पष्ट केले.
तसेच, पोहरादवीच्या महंतानी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते. त्या पत्रात संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांवर संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना आता पोहरादेवीमध्ये तीन महंतांची बैठक घेतली होती. पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनी विरोध केला होता. तसेच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही दिला आहे.

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि चित्र वाघ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना, “संजय राठोडांनी राजीनामा दिला असला, तरी पूजाला न्याय मिळावा आणि संजय राठोड यांच्यावर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करावी असे म्हटले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच माध्यमांशी बोलताना राठोड यांच्या राजीनाम्याबद्दलचे संकेत दिले होते. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते लक्षपूर्वकपणे यावर निर्णय घेतील,’ असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले होते. यानंतर आज सकाळी राऊत यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!