#FarmerProtest : ‘रेल रोको’; लासूर रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला

दिल्लीच्या सीमेवर 100 दिवसांहून अधिक दिवसांपासून शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. शतकऱ्यांने आंदोलन तीव्र केले असून आज देशव्यापी चार तासांचे ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादेत रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. परंतु, समोरून येणाऱ्या धावत्या रेल्वेसमोरच कार्यकर्ते धावत सुटले होते, सुदैवाने पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने औरंगाबादेत रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते. लासूर रेल्वे स्थानकाजवळ कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात सुपर फास्ट एक्स्प्रेस आली. या गाडीला लासूर स्थानकावर थांबणार नव्हती. समोरून भरधाव रेल्वे येत असताना सुद्धा कार्यकर्ते ट्रॅकवरून बाजूला हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी धाव घेऊन कार्यकर्त्याला रेल्वे ट्रॅकवरून बाजूला खेचले त्यामुळे कार्यकर्ते अवघ्या काही सेंकदाने बचावले आहे. ही रेल्वे पुढे काही अंतर जाऊन थांबली. सुदैवाने रेल्वे थांबल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.