#FarmerProtest : शेताऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा उतरले मैदानात

शेतकरी आंदोलनामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रबळ स्थान असलेल्या जाट क्षेत्रात नाराजी वाढत आहे. ही नाराजी दूर करण्याकरता आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला असून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील जाट बहूल क्षेत्रात वाढलेली केंद्र सरकारबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी दिल्लीत बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. मात्र शेतकरी नेते राकेश टीकेत यांच्या भावनात्मक आवाहनानंतर संपूर्ण जाट बहूल क्षेत्रात शेतकरी महापंचायती सुरू झाल्या आहेत. यामुळे भारतीय जनता पक्षाचा पाठीराखा असलेला हा प्रदेश भाजपच्या मतपेटीच्या राजकारणातून दूर तर जाणार नाही ना, अशी चिंता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना लागली आहे. त्यामुळेच गेल्या आठवडाभरापासून विविध बैठकीचे सत्र सुरू आहे.
या बैठकीमध्ये शेती कायदे कसे लाभकारी आहे यासंदर्भात एक पुस्तिका तयार करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सर्व जबाबदारी स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देण्यात आली आहे. यासंदर्भात माजी मंत्री संजीव बाली आनंद यांच्या निवासस्थानी देखील आज एक महत्वाची बैठक झाली. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून निर्माण होत असलेल्या नाराजीला दूर करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाची धार कशी कमी करता येईल यासाठी देखील भारतीय जनता पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत.