किसान सन्मान योजनेचे ६ लाख अर्ज पडताळणीसाठी गेले पण राज्याला निधी मिळालाच नाही – ममता बॅनर्जी

दिवसेंदिवस पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. तृणणूल काँग्रेस, भाजप अनेक मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत केंद्र सरकारवर टीका करत किसान सन्मान योजनेचा निधी अद्याप आला नसल्याचा दावा केला आहे.
विधानसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी सांगितले की ,पश्चिम बंगालमधील कृषक बंधू योजनेतील निधी वाढवून सहा हजार रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेच्या माध्यमातून ५ हजार रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम एक हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. राज्यात १९ औद्योगिक प्रकल्पांची सुरुवात केली जाईल. यासाठी सुमारे ७२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यातून ३.२९ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दरम्यान , ममता बॅनर्जी यांनी नमूद केले की, राज्य सरकारकडून केंद्र सरकारला २.५ लाख शेतकऱ्यांची नावे पाठवली होती. मात्र, अद्यापही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी राज्याला मिळाला नाही. केंद्राकडून राज्य सरकारला सहा लाख अर्ज पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी २.५ लाख अर्ज शेतकऱ्यांचे आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना हल्दिया येथील सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकार आणि तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. ममता बॅनर्जी सरकार आयुषमान भारत आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना तसेच स्थानिकांना मिळू देत नाही, असा आरोप केला होता. पश्चिम बंगालचे सरकार आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन या दोन्ही योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना दिले होते.