Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : सायबर, दुचाकी, मंगळसूत्र चोऱ्या रोखण्याचे मोठे आव्हान : पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता

Spread the love

लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले ;

यंदा गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ६ टक्क्यांनी वाढले

वर्षभरातील कामगिरीचा घेतला आढावा

औरंगाबाद : शहरात दुचाकी, सायबर, मंगळसूत्र चोरांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व यंत्रणा नियोजनबद्ध काम करत असून या वाढत्या घटनांना लवकरच आळा घालू अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली. पोलीस दलाच्या वर्षभरातील कामगिरीची सविस्तर माहिती देण्यासाठी बुधवारी पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. या काळात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून गतवर्षीच्या तुलनेत गुन्हे उघडकीस आणायचे प्रमाण हे सहा टक्क्यांनी वाढले असल्याचेही डॉ. गुप्ता म्हणाले.

यावेळी पोलीस उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे पाटील, दीपक गिर्हे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक  पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, आयुक्तांचे वाचक सुभाष खंडागळे आदी उपस्थित होते. शहरात दुचाकी, सायबर, मोबाईल, घरफोडी आणि मंगळसूत्र चोरानी धुमाकूळ घातला आहे. दररोज विविध भागातून चर ते पाच दुचाकी चोरीला जात आहेत. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा, विशेष शाखा आदी सर्व यंत्रणा दुचाकी चोऱ्या रोखण्यासाठी व उघडकीस आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी आणि ४ कर्मचाऱ्यांचे एक पथक अशी २० पथके तयार करण्यात आली आहेत. हे पथक दुचाकी, मंगळसूत्र चोऱ्या रोखणे आणि उघडकीस आणण्यासाठी काम करत आहेत. या सोबतच नागरिकांनी देखील आता कंपनीच्या एकाच हँडल लॉकवर निर्भर राहून दुचाकी सोडून जाऊ नये. आणखी एखादे लॉक दुचाकीला लावावे. शक्यतो दुचाकी पार्किंगमध्ये लावावी असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले. नोव्हेंबर अखेर दुचाकी चोरीचे ५६३ गुन्हे दाखल असून त्यातील केवळ १४९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

यावर्षी शहरात मंगळसूत्र चोरीच्या २० घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली. त्यातील केवळ ३ गुन्हे उघडकीस आले आहे. पत्ता विचारण्याचा बहाण्याने आणि विशेषतः पन्नास वर्षे उलटलेल्या महिलांना मंगळसूत्र चोर टार्गेट करत असल्याचे आजवरच्या घटनांवरून उघड होत असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

पोलीस कर्मचाऱ्यांचेही आता समुपदेशन

पोलीस ठाण्यात नागरिकांना योग्य वागणूक मिळत नाही चांगले बोलले जात नाही. अशा तक्रारी असतात. असे प्रकार होऊ नयेत यासाठी आता पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. यासाठी अनेक चांगले मॉडेल आलेले आहेत. प्रायोगिक तत्वावर एका ठाण्यात हा प्रयोग राबविण्याचा विचार असून तो यशस्वी झाला तर अन्य सर्व पोलीस ठाण्यात हा प्रयोग राबवण्यात येईल. कर्मचाऱ्यावरील ताणतणाव कमी करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप राबविण्याचा येणार असल्याचेही डॉ. गुप्ता म्हणाले.

नागरिकांच्या सहभागाशिवाय पोलिसिंग अशक्य

नागरिक आणि पोलिसांची जुळलेली नाळ अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्न आहे. नागरिकांकडून योग्य सूचना, तक्रारी थेट आमच्यापर्यंत पोहोच व्हाव्या यासाठी सिटीझन हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. पोलिसांनी कशाप्रकारे काम केले पाहिजे याबाबत देखील नागरिकांकडून सूचना मागवण्यात येतील. आलेल्या सर्व सूचना व तक्रारींवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करून अंमलबजावणी करतील असे पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले.

गुंडागर्दी नहीं चलेगी

आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्या अनुषंगाने सध्या शहरात धार्मिक- जातीय तेढ निर्माण होईल असे वातावरण तयार केले जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावर बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, सर्व परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष आहे. कोणीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. तसे प्रकार निदर्शनास आल्यावर त्यावर कडक कारवाई केली जाईल. शहरात आलो तेव्हाच म्हणालो होतो. गुंडा गर्दी नहीं चलेगी तेच आजही सांगतो आणि शहरातून जातानाही मी हेच सांगेन असा इशारा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना डॉ. गुप्ता यांनी पुन्हा इशारा दिला.

वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न

शहराची ओळख ही तिथल्या ट्रॅफिकवरून होत असते. त्यामुळे सध्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नवीन प्रयोग केले जात आहेत. विशेषतः जालना रोडवर सर्वाधिक वाहतूक आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून आता अमरप्रित चौक, आकाशवाणी हे दोन सिग्नल दिवसातून काही विशिष्ट तास बंद ठेऊन वणवे ट्राफिक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काहीप्रमाणात कमी होईल. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे तो कायम करण्याचा विचार असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!